ओरोस:
केंद्र शासनाच्या किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत जिल्हय़ातील दुग्ध, कुक्कुट, शेळीमेंढी आणि मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी जिल्हा बँकेकडून आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे शेतकऱयांना जनावरांना लागणारे खाद्य, वैरण, चारा आदी साहित्य एकाचवेळी खरेदी करणे शक्य होणार असल्याचे सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यासाठीचा सर्व्हे सुरू करण्यात आला असून एक जुलैपासून योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पशुसंवर्धन व्यवसायाच्या वाढीबाबत विचारविनिमय करण्यासाठी जिल्हा बँकेच्या वतीने गुरुवारी ओरोस येथे गोकुळ दूध संघ, सर्व दूध सहकारी संस्थांच्या अध्यक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी एम. के. गावडे, दिगंबर पाटील, नीता राणे, संग्राम प्रभूगावकर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई आदी उपस्थित होते. यावेळी घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती सतीश सावंत यांनी दिली.
भात पिकासाठी शेतकऱयांना अल्प व्याजदराने रक्कम दिली जाते. त्याच धर्तीवर दुग्ध, कुक्कुट, शेळीमेंढी आणि मत्स्य व्यवसायासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याबाबतच्या विषयावर चर्चा करण्यात आली. या व्यवसायाला मदतीची आवश्यकता असल्याने किसान क्रेडिट कार्ड या केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सावंत यांनी सांगितले. अशा पद्धतीची सुविधा देणारी ही महाराष्ट्रातील पहिली जिल्हा बँक असल्याचेही सावंत यांनी स्पष्ट केले.
स्थानिक गाई-म्हशी, संकरित गाय, मुरा पंढरपुरी म्हैस, 500 पक्ष्यांचे कुक्कुट पालन, दहा शेळी व एक बोकड असा शेळीमेंढी गट व मत्स्य व्यवसाय यासाठी ही सुविधा उपलब्ध राहणार आहे. 25 जूनपर्यंत याबाबतचा सर्व्हे केला जाणार आहे. त्यानुसार 1 जुलैला बँकेच्या वर्धापन दिनापासून ही योजना अंमलात आणली जाणार आहे, असेही सावंत यांनी सांगितले.
अडीच कोटीची थकबाकी
दरम्यान, यापूर्वी शेतकऱयांकडील दूध संकलन करणाऱया कोल्हापूर येथील प्रतिभा दूध डेअरीकडे 2 कोटी 60 लाख रुपये येणे बाकी आहे. ही थकबाकी न मिळाल्याने दूध संघांनी त्याच्या वसुलीबाबत आग्रही भूमिका मांडली. त्यामुळे हे पैसे वसूल करून शेतकऱयांना मिळवून देण्याच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी मतभेद विसरून प्रयत्न करण्याचे आवाहनही सावंत यांनी केले आहे. दूध संघांचे चेअरमन याबाबत सर्व राजकीय पदाधिकाऱयांची भेट घेणार असल्याचे घेऊन लक्ष वेधणार असल्याचेही त्यांनी सांगितले.