प्रतिनिधी /बेळगाव
मूळच्या सांगलीच्या व सध्या पुणे येथे राहणाऱया जुन्या पिढीतील कीर्तनकार व प्रवचनकार हभप कुसुमताई बापट (वय 92) यांचे दि. 6 रोजी पुणे येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगी, तीन मुले, नातवंडे, पणतवंडे असा परिवार आहे. बेळगावचे व्यावसायिक व जायंट्सचे माजी अध्यक्ष मकरंद बापट यांच्या त्या मातोश्री होत.
कुसुमताई यांनी जवळपास 40 वर्षे कीर्तन व प्रवचनातून समाज प्रबोधनाचे काम केले. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर, गोंदवले येथील राममंदिर तसेच महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गोवा या राज्यांमध्ये त्यांची प्रवचने झाली होती. महाराष्ट्र कीर्तनकार कुलाच्या त्या माजी खजिनदार होत्या. तसेच सांगलीतील महिला परिषदेच्या माजी संचालिका होत्या. बेळगावमधील मारुती मंदिर, काणे राम मंदिर, टिळकवाडी राम मंदिर, शहापूर-विठ्ठल मंदिर यासह संभाजी उद्यानातील ज्ञानेश्वर पारायण सोहळा, खानापूर, जांबोटी या ठिकाणी त्यांची प्रवचने झाली होती.