बॉम्बवर्षावातही देखभाल करताहेत नर्स : विदेशातील पालक येणे सध्या अवघड
धूळयुक्त जिने, हादरणाऱया भिंती आणि बॉम्बवर्षावादरम्यान अनेक नॅनीज नवजातांची देखभाल करत आहेत. या नॅनीजची एक नजर टीव्हीवर रशिया-युक्रेन युद्धासंबंधी वृत्तांवर तर दुसरी नजर नवजातांकडे लागून राहिलेली असते.
युक्रेनची राजधानी कीव्हच्या या तळघरात 19 नवजात आहेत. या सर्वांना सरोगेट मातेने जन्म दिला आहे. युद्धादरम्यान या जीवांनी डोळे उघडल्यावर नव्या अडचणी देखील उभ्या ठाकल्या आहेत. या सरोगेट नवजातांचे भविष्य सध्यातरी अनिश्चित आहे. युद्धामुळे या नवजातांचे आईवडिल कधी त्यांना न्यायला येतील की नाही हेच निश्चित नाही.
कीव्हमध्ये सरोगेट मातांसाठी निर्मित या सेफ्टी बंकरला सरोगेट प्रोव्हायडर कंपनी बायोटेक्सकॉमने तयार केले आहे. माझे पती युक्रेनच्या सैन्यात असून मी येथून दूर निघून जावे असे त्यांना वाटते, परंतु मी जाऊ शकत नाही, मी या बाळांना कसे सोडून देऊ असे विधान नवजातांची देखभाल करणाऱया येशेन्को यांनी केले आहे.
जगातील सर्वात मोठे सरोगेसी हब असलेल्या युक्रेनमध्ये दरवर्षी सरोगेट बाळांसाठी जोडपी येत असतात. परंतु युद्धाने स्थिती बदलली आहे. सरोगेट नवजातांची देखभाल करणाऱया नॅनीजना मुलांचे जैविक पालक स्वतःच्या मुलांना भेटण्यास कधी येतील हेच माहित नाही. बहुतांश सरोगेट अपत्यांचे पालक विदेशी आहेत. अशा स्थितीत या मुलांचे नागरिकत्व देखील धोक्यात आहे. युक्रेनच्या कायद्यानुसार मुलांच्या जैविक पालकांना स्वतःचा अधिकार प्राप्त करण्यासाठी स्वतः हजर राहणे आवश्यक आहे.