कंपनी चालविली जात होती भागिदारीत
प्रतिनिधी/ मडगाव
कुंकळळी औद्योगिक वसाहतीतील मासळीवर प्रक्रिया करणाऱया ‘क्वालिटी फुड्स’ या कंपनीच्या व्यवस्थापनाविरुद्ध कुंकळळी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या 304 (सदोष मनुष्यवध) व 337 (निष्काळजीपणे दुसऱया व्यक्तींना दुखावणे) कलमाखाली गुन्हा नोंद केल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्री. डिकॉस्ता यांनी दिली आहे. या कंपनीचे एकूण सहा भागीदार असल्याचे पोलीस तपासात आढळून आले असून त्यांच्या विरोधात हा गुन्हा नोंद झालेला आहे.
शुक्रवारी क्वालिटी फुड्स कंपनीत ‘अमोनिया’ गॅसची गळती होऊन एका कामगारांचा बळी केला होता तर अन्य चौघांची प्रकृती बिघडली होती. या कामगारांना पणजीच्या टीबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती कुंकळळी पोलिसांनी दिली. या कामगारांची प्रकृती स्थिर असली तरी शेवटी गॅस गळतीची बाधा झाल्याने शरीरात अंतर्गत किती जखम झालेली असले यांचा अंदाज बांधणे कठीण असल्याने, या कामगारांवरील अद्याप धोका टळलेला नसल्याचे मत देखील पोलिसांनी व्यक्त केले आहे.
यापूर्वीही घडल्या होत्या अपघाताच्या घटना
शुक्रवारी अमोनियाची गळती झाल्यानंतर किशनकुमार (22) या कामगाराचा गुदमरून बळी गेला होता. कुंकळळी औद्योगिक वसाहतीत यापूर्वी देखील अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत. जेव्हा अपघाताच्या घटना घडतात, त्यावेळी कंपनीत काम करणारे कामगार तसेच अधिकारी कुणालाही घटनास्थळी भेट देण्यास मज्जाव करीत असतात. शुक्रवारीसुद्धा असाच प्रकार घडला. अग्निशामक दल जेव्हा घटनास्थळी पोहचले, तेव्हा त्यांनाही रोखण्याचा प्रकार घडला.
सरकारने उपाययोजना आखावी
कुंकळळी औद्योगिक वसाहतीत पारदर्शकता ठेवण्यासाठी सरकारने उपाययोजना आखावी, अशी मागणी आता स्थानिक लोकांकडून होत आहे. यंदा या औद्योगिक वसाहतीत कोरोनाचा फैलाव झाला होता, तेव्हासुद्धा असाच प्रकार स्थानिक नगरसेवकांनी अनुभवला होता. येथील कंपन्याचे मालक कुणाला जुमानत नाही असेच सध्या चित्र या ठिकाणी निर्माण झालेले आहे.