सुदेश भिसे अपक्ष लढण्याच्या तयारीत
प्रतिनिधी /मडगाव
कुंकळळी मतदार संघात भाजपच्या उमेदवारीवरून तीव्र मतभेद निर्माण झालेले असून या मतदारसंघात भाजपची उमेदवारी आमदार क्लाफास डायस यांना मिळणार हे जवळपास नक्की असल्याने, उमेदवारीसाठी इच्छुक असलेले मंडळाचे उपाध्याक्ष सुदेश भिसे हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.
सुदेश भिसे हे कुंकळळी मतदारसंघात भाजप मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. कुंकळळी मतदारसंघात गेल्या पाच वर्षापासून त्यांनी अनेक समाजपयोगी कार्यक्रम हाती घेतले होते. कोविडच्या काळात तर त्यांनी अनेकांना मदतीचा हात दिला. स्वता रूग्णवाहिका खरेदी करून ती रूग्णांसाठी उपलब्ध करून दिली. रूग्णवाहिकेचा ड्रायव्हर जेव्हा उलपब्ध होत नसे, तेव्हा ते स्वताच ड्रायव्हर होऊन लोकांना दिलासा देत होते.
कुंकळळी तसेच गिरदोली-चांदर भागातील लोकांना वीज व पाण्याची बिले भरण्यासाठी केंद्र सुरू केले. कुंकळळी मतदारसंघातील युवकांसाठी त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले. त्यांच्यासाठी विविध उपक्रम राबविले. कुंकळळी मतदारसंघ हा नगरपालिका व पंचायती असा विभागलेला असून आपण पालिका क्षेत्र तसेच सर्व पंचायत क्षेत्रातील लोकांना आपल्या परिने शक्य तेव्हढी मदत केल्याचे ते सांगतात. आपण सातत्याने लोकांच्या संपर्कात असल्याने भाजप आपल्या कामाची नोंद घेऊन उमेदवारी देईल अशी अपेक्षा होती. मात्र, काँग्रेसमधुन भाजपमध्ये आलेल्या क्लाफास डायस यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. कुंकळळी मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्याच्या तसेच हितचिंतकांच्या गाठी भेटी घेण्यास त्यांनी सुरवात केली असून सर्वांना विश्वासात घेऊनच आपण निवडणूक लढविण्यासंदर्भातील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.