प्रतिनिधी/ मडगाव
कुंकळळी पालिकेच्या नगराध्यक्षांना पदावरून हटवा अन्यथा परिणामांना सोमोर जा असा इशारा कुंकळळीतील व्यापारी संघटणेने स्थानिक काँग्रेस नेत्यांना दिला आहे. नगराध्यक्ष लक्ष्मण नाईक यांना कुंकळळीतील व्यापाऱयांच्या समस्या सोडविण्यात अपयश आल्याची टीका व्यापाऱयांनी केली आहे. व्यापाऱयाची जाहीर सभा कुंकळळीत टॅक्सी स्थानकावर झाली. त्यात हा इशारा देण्यात आलेला आहे.
या जाहीर सभेत बोलताना व्यापाऱयांनी नगराध्यक्ष लक्ष्मण नाईक यांच्यावर जोरदार टीका केली. व्यापारी आपल्या समस्या मांडण्यास गेल्यास नगराध्यक्ष कोणत्याच प्रकारचे सहकार्य करीत नाही. उलट उर्मट उत्तरे देत असल्याचा आरोप करण्यात आला.
नजिकच्या काळात पाडले जाण्याची शक्यता असलेल्या आणि ज्यांना नवीन दुकाने देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. अशा राष्ट्रीय महामार्गावरील आणि कुंकळळी-केपे रस्त्यावरील दुकान मालकांच्या पुनर्वसनाचा मुद्दा मांडण्यासाठी कुंकळळीतील व्यापाऱयांनी जाहीर सभा घेतली होती. कुंकळळीत नवीन व्यावसायिक इमारत बांधण्यात आली होती. या नवीन इमारतीतील पुनर्वसनाचे आश्वासन व्यापाऱयांना दिले होते. मात्र, या आश्वासनाची पूर्तता केली जात नाही. आता पालिकेने या दुकानांचा लिलाव करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावामुळे 21 दुकानावर पुनर्वसनाची कुऱहाड कोसळण्याची शक्यता आहे.
या सभेत बोलताना व्यापारी यतीन तळावलीकर म्हणाले की, कुंकळळी पालिकेने पुढील 20-25 वर्षात अस्तित्वात असलेली दुकाने पाडली जाणार नाहीत असे स्पष्ट आश्वासन दिल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत लिलाव करू नये. कुंकळळी पालिकेचे मंडळ जर कुंकळळी व्यापारी संघटणेला किंवा दुकान मालकांना पुढील 20-25 वर्षे त्यांची जागा पाडली जाणार नाही असे आश्वासन देण्यास तयार असेल तरच ते लिलावासाठी जाऊ शकतात. आपण स्वता या संदर्भात विचारपूस करण्यासाठी गेलो असता नगराध्यक्षांनी आपल्याला तबला वादनाच्या छंदा बद्दलचा उल्लेख करून अपमानीत केल्याचे सांगितले.
आम्ही कायद्याचे पालन करणारे नागरिक आहोत. आम्हाला पालिकेच्या बैठकीत व्यत्यय आणायचा नाही. आम्ही कायद्याचे पालन करणारे नागरिक आहोत. आजपर्यंत आमच्या विरोधात कोणत्याही पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार नोंदवलेली नाही. नगग्नराध्यक्षाचे वागणे बरोबर नसल्याने ज्यांनी त्यांना खुर्चीवर बसविले आहे. त्यांनी त्वरित हटवावे. अन्यता विधानसभा निवडणुकीत त्यांचे परिणाम भोगावे लागतील.
या बैठकीला मडगाव व्यापारी संघटणेचे अध्यक्ष विनोद शिरोडकर व कार्यकर्ते अविनाश तावारीस उपस्थित होते. यावेळी संघटणेचे सचिव इरिनु कुतिन्हो यांचे ही भाषण झाले. विनोद शिरोडकर म्हणाले की, व्यापाऱयांनी संघटित राहणे खुपच आवश्यक आहे. व्यापारी संघटित राहिल्यास पालिकेला सामोरे जाणे कठीण नाही.
कुंकळळीचे नागरिक डॉ. जोर्सन फर्नांडिस व नगर प्रशासनाचे माजी संचालक एल्विस गोम्स यांनी या बैठकीला उपस्थित राहून व्यापाऱयांना पूर्ण पाठिंबा दर्शविला. संघटणेचे खजिनदार दत्तराज हेगडे यांनी 2019 मध्ये संघटणेची स्थापना कशी झाली आणि त्यांनी समाजाच्या फायद्यासाठी केलेल्या उपक्रमांची माहिती दिली.