व्यापारी संघटनेच्या निवेदनानंतर पालिकेचा निर्णय
प्रतिनिधी / कुंकळ्ळी
कोविडच्या फैलावाची धास्ती घेऊन कुंकळ्ळी पालिकेने अखेर कुंकळ्ळी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय मंगळवारी अवघ्या तासाभरात घेतला. मार्केट बंद ठेवण्यासंबंधी कुंकळ्ळी व्यापारी संघटनेच्या शिष्टमंडळाने पालिकेला मंगळवारी निवेदन सादर केले होते. कुंकळ्ळीत कोविडबाधितांच्या संख्येत भर पडत असल्याबद्दल यावेळी चिंता व्यक्त केली. कुंकळ्ळी व्यापारी संघटनेचे इरिनियू कुतिन्हो, सुभाष देसाई, पॉल बोर्जिस व यतीन तळावलीकर यांनी उपनगराध्यक्ष झेवियर अँथनी वाझ यांची भेट घेऊन कोविड फैलाव वाढत असल्याचे निदर्शनास आणून दिले.
यासंबंधी कुंकळ्ळी पालिकेने अंमलबजावणी मंगळवार 4 पासून जाहीर केली असून 11 पर्यंत मार्केट बंद राहणार आहे. केवळ औषधालये व जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना वगळण्यात आले असून इतर बार, रेस्टॉरंट, गोदामे, कपडय़ाची दुकाने, सलून, इलेक्ट्रॉनिक साहित्याची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. तर पेट्रोल पंप, गॅस सिलिंडर एजन्सी तसेच किराणामालाची व इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी 7 ते 11 पर्यंत खुली राहतील. सर्व नागरिकांना पालिकेने सहकार्य करण्याचे आवाहन जाहीर निवेदनातून केले आहे कुंकळ्ळीत बाजारात येणारे बहुतांश लोक हे जास्त करून ग्रामीण भागांतील असतात. 10 ते 15 किलोमीटर अंतरावरून ते कुंकळ्ळीत बाजारहाट करण्यासाठी पोहोचतात. लोकांची गैरसोय टाळण्यासाठी पालिका व व्यापारी संघटनेने घेतलेल्या निर्णयाचे नागरिकांनी स्वागत केले आहे. निर्णय योग्य असल्याचे सामाजिक कार्यकर्ते व कुंकळ्ळी सीपीएलचे अध्यक्ष गौरीश फडते म्हणाले. नागरिकांनी सरकारी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सामाजिक कार्यकर्ते मंजुनाथ शिरवंत यांनीही स्वागत केले आहे. मात्र पालिकेने निर्णय घेण्यात विलंब केला. व्यापारी संघटनेने निवेदन देऊन पालिकेचे लक्ष वेधले हे बरे झाले. मात्र निवेदन दिल्यानंतर घिसाडघाईत अवघ्या तासाभरातच मार्केट बंद करण्याचा निर्णय जाहीर करून पालिकेने व्यापाऱयांना अडचणीत आणले. एक दिवस आधी निर्णयाची माहिती लोकांना मिळणे आवश्यक होत, असे सांगून शिरवंत यांनी आपली नाराजी व्यक्त केली. मंगळवारी दुकाने बंद न केलेल्या व्यापाऱयांना गृहीत धरू नका, असे त्यांनी म्हटले आहे.