प्रतिनिधी /कुंकळ्ळी
कुंकळ्ळीतील सुप्रसिद्ध साऊद सायबिणीचे वार्षिक फेस्त आज बुधवार 2 रोजी साजरे करण्यात येणार आहे. यंदाचे फेस्त 8 वा वांगड, वेरोडा यांच्यातर्फे साजरे करण्यात येत आहे. कुंकळ्ळीतील ही चर्च पुरातन असुन या चर्चला 400 वर्षांचा इतिहास आहे. फेस्तात ख्रिस्तीधर्मियांप्रमाणे अन्य धर्मांतील लोकही मोठय़ा प्रमाणात सहभागी होत असतात. हिंदूधर्मीयही दर्शन घेण्यासाठी चर्चमध्ये उपस्थिती लावतात आणि मेणबत्त्या पेटवण्यात हमखास सहभागी होतात.
फेस्तानिमित्त पहाटे 5, सकाळी 6, 7, 7.15, 8.30 व मुख्य 10 वा. अशा सहा प्रार्थनासभा होणार आहेत. चर्चची रंगरंगोटी करण्यात आली असून समोर मंडपही उभारण्यात आला आहे. या फेस्तानिमित्त फुलविपेते, मेणबत्तीविपेते हे मोठय़ा प्रमाणात जमतात. तसेच फेरीत चणे, मिठाई, कपडय़ांचे व इतर व्यापारी दुकाने थाटतात. फेस्ताला सात दिवस असताना दांदोरा येथे मुख्य रस्त्याजवळ धार्मिक स्थळी पारंपरिक पद्धतीने वाजतगाजत ‘माडी’ उभारण्याची परंपरा पाळली जाते. येथे प्रार्थना होतात व दर्शन घेण्यासाठी तसेच आपले नवस फेडण्यासाठी लोकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी होते. यंदाचे फेस्त शिस्तबद्धरीत्या व उत्साहात साजरे व्हावे यासाठी खबरदारी घेण्यात आली असून कोविडमुळे नागरिकांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि अन्य सरकारी नियमांचे पालन करावे, असे आवाहन अवर लेडी ऑफ हेल्थ चर्चच्या कॉन्फेरिया समितीचे पदाधिकारी ऑस्कर मार्टीन यांनी केले आहे.