आमदार क्लाफासियो डायस, भाजप नगरसेवकांसह लोकांनी नगराध्यक्षांना विचारला जाब, टाळे उघडण्यास राजी होत नसल्याने संतप्त लोकांकडून कृती
प्रतिनिधी / कुंकळ्ळी
कूलवाडा-कुंकळ्ळी येथे आरोग्य उपकेंद्र उघडण्याची तयारी चाललेली असताना सदर जागेला कुंकळ्ळी पालिकेचे नगराध्यक्ष लक्ष्मण नाईक यांनी टाळे ठोकण्याच्या जो प्रकार घडला त्याचे तीव्र पडसाद गुरुवारी उमटले. नगराध्यक्ष टाळे खोलण्याची मागणी मान्य करत नसल्याने संतप्त लोकांनी नंतर टाळे मोडून टाकले.
सदर उपकेंद्राचे उद्घाटन स्थानिक आमदार क्लाफासियो डायस यांच्या वाढदिनी म्हणजे उद्या 25 रोजी करण्याचे नियोजन असून या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष नाईक यांनी बुधवारी या केंद्राला टाळे ठोकले. कायदेशीर बाबी पूर्ण न झाल्यामुळे या जागेचा ताबा आरोग्य खात्याकडे देता येणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला. बुधवारी वीज व पाणीपुरवठा खात्याचे कर्मचारी वीजजोडणी व पाण्याची जोडणी देण्यात आले असता नगराध्यक्षांनी त्यांना काम करण्यास परवानगी दिली नाही.
नगराध्यक्षांना विचारला जाब
या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी आमदार डायस यांनी भाजपप्रणीत नगरसेवक व इतर स्थानिक लोकांसह जाऊन नगराध्यक्ष नाईक यांना जाब विचारला व चावी मागितली. यावेळी नगरसेविका पॉलिता कारनेरो, रूपा गावकर, राहुल देसाई व विशाल देसाई, माजी नगराध्यक्ष मारियो मोराईस व शशांक देसाई तसेच मंजुनाथ शिरवंत, जॉर्जिना गामा, खातून शेख, संकिता देसाई, ख्रिस्ती रेगो, नेविल काल्देरा, विशाल कालेकर, मन्सूर शेख व अन्य नागरिक उपस्थित होते. उपनगराध्यक्ष अँथनी वाझ व सत्ताधारी गटाचे इतर नगरसेवक केबिनमध्ये उपस्थित होते. यावेळी हजर असलेले मुख्याधिकारी व बाळ्ळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्याधिकारी डॉ. ममता काकोडकर यांनी उपकेंद्रासाठी आवश्यक सर्व सोपस्कार करण्यात आले असल्याची माहिती नगराध्यक्षांना दिली.
थातूरमातूर उत्तरांमुळे संतापात भर
मात्र नगराध्यक्ष नाईक बधले नाहीत व त्यांनी थातूरमातूर उत्तरे दिली. नाईक व जाब विचारण्यासाठी आलेल्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन आरोप-प्रत्यारोपही झाले. यावेळी नगराध्यक्ष विकासात खो घालत असून जर चावी दिली नाही, तर कुंकळ्ळी पालिकेत आम्ही धरणे धरू, असा इशारा नगरसेविका कारनेरो यांनी दिला. सत्ताधारी मंडळाकडून कुंकळ्ळी आधुनिक शहर बनविणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते. हेच काय त्या दिशेने चाललेले काम आहे आणि हाच विकास आहे का, असा सवालही नगराध्यक्षांना करण्यात आला. तरीही नगराध्यक्ष दाद देत नसल्याने शेवटी संतप्त लोकांनी मोर्चा उपकेंद्राच्या जागेकडे वळवून त्या ठिकाणी ठोकलेले टाळे मोडून टाकले. यावेळी भाजपप्रणित नगरसेवक उपस्थित होते. त्यानंतर तिथे आमदार डायस हजर झाले. उपस्थित लोकांनी व नगरसेवकांनी त्यांना संपूर्णपणे पाठिंबा व्यक्त केला.
आरोग्य सुविधांची उणीव दूर करण्याचा प्रयत्न
कुंकळ्ळीत चार वर्षांपूर्वी पॉलिता कारनेरो या नगराध्यक्षा असताना या इमारत प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती. पालिका क्षेत्रात आरोग्य सुविधा नसून त्यासाठी बाळ्ळी येथे जावे लागते. त्यामुळे आपण आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने ठराव घेण्यास पालिकेला सांगितले होते. आंजेला पैंगीणकर या नगराध्यक्षा असताना तसा ठराव घेण्यात आला होता. दोन महिन्यांपूर्वी आपण मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना या ठिकाणी बोलावून सदर इमारत दाखविली होती आणि त्यांनी पाहणी केल्यानंतर त्यात आरोग्य उपकेंद्र सुरू करण्यास आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यास संमती दिली होती, अशी माहिती आमदार डायस यांनी दिली.
सर्व सोपस्कार करूनही खो
मुख्याधिकाऱयांनी पालिकेचा ठराव व इतर आवश्यक कागदपत्रे पाठवून दिल्यानंतर पालिका संचालकांनी त्यास मान्यता दिली होती. यानंतर आपण मुख्याधिकाऱयांना सदर जागा आरोग्य खात्याच्या ताब्यात देण्यास सांगितले असता त्यांनी काम पूर्ण झाल्याचा दाखला मिळालेला नसल्याचे लक्षात आणून दिले होते. आपण नगरनियोजन खात्याला सांगून सदर खात्याने दोन-तीन दिवसांत तो दाखला दिला होता. त्यानंतर तेथे उपकेंद्र सुरू करण्यास मुख्याधिकाऱयांनी आरोग्य खात्याला कळविले होते. असे असताना जेव्हा वायरिंगसाठी वीज कर्मचारी आले तेव्हा या ठिकाणी टाळे ठोकले असल्याचे दिसून आले. यासंदर्भात विचारले असता पालिका अभियंता, मुख्याधिकाऱयांनी आपण टाळे ठोकले नसल्याचे स्पष्ट केले, असे डायस यांनी सांगितले. आपण स्वतः जागेचा ताबा आरोग्य खात्याकडे द्यावा असे पत्र नगराध्यक्षांना पाठविले होते. त्यावेळी असे पत्र आरोग्य खात्याकडून यायला हवे असा पवित्रा नगराध्यक्षांनी घेतला होता. त्यानुसार खात्याकडून पत्र आल्यानंतरही त्यांनी जागेचा ताबा का दिला नाही, असा प्रश्न डायस यांनी केला.