मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपस्थित राहणार, प्रकल्पावर 15 कोटी खर्च
प्रतिनिधी / कुंकळ्ळी
कुंकळ्ळीत नव्याने बांधलेल्या नगरपालिकेच्या इमारतीचे आज गुरुवार 18 रोजी सायंकाळी 6 वा. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी सन्माननीय पाहुणे म्हणून नगरविकासमंत्री मिलिंद नाईक, कुंकळळी आमदार व मुरगाव पीडीएचे अध्यक्ष क्लाफासियो डायस, जी-सुडाचे सचिव तारीक थॉमस, सदस्य सचिव गुरुदास पिळर्णकर, कुंकळ्ळी नगरपालिका प्रशासक फॉरिना कुलासो ई फर्नांडिस, कुंकळळी पालिका मुख्याधिकारी व्हायलेट गोम्स व जी-सुडाचे ज्ये÷ प्रकल्प अभियंता हुसेन शेख उपस्थित राहणार आहेत.
कुंकळ्ळीत ही एक देखणी इमारत झाली असून त्यामुळे कुंकळ्ळीची शान वाढण्यास मदत झाली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व तत्कालीन नगरविकासमंत्री फ्रान्सिस्को डिसोझा, तत्कालीन आमदार राजन नाईक यांच्या कार्यकाळात त्यांच्या हस्ते या इमारतीची पायाभरणी करण्यात आली होती. या इमारतीकरिता आतापर्यंत 15 कोटी रु. खर्च झाले असून सुरुवातीला 9 कोटींची निविदा काढण्यात आली होती व नंतर 12 कोटींपर्यंत वाढीव खर्च पोहोचला. इमारत पूर्ण होईपर्यंत खर्च 15 कोटींपर्यंत पोहोचला.
या इमारतीच्या ठिकाणी मोठी पार्किंग जागाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. दोन मजली इमारतीच्या तळमजल्यावर पुढच्या बाजूला 22 दुकाने व 16 दुकाने मागच्या बाजूला असून पहिल्या मजल्यावर 20 कार्यालयांसाठी जागा उपलब्ध आहे. दुसऱया मजल्यावर 16 दुकाने व एका सभागृहासाठी जागा उपलब्ध आहे. दुकाने व इतर जागांचा लिलाव केला जाणार असून याकरिता यापूर्वीच नगरपालिकेने बांधकाम विभागाकडे संपर्क साधून सविस्तर माहिती मागवली आहे. दरम्यान, तळमजल्यावर साहाय्यक वीज अभियंता कार्यालयासाठी जागा देण्याचे पालिकेच्या विचाराधीन आहे. त्यामुळे मडगावात जाऊन करावी लागणारी कामे कुंकळ्ळीत होतील. ही सोय उपलब्ध झाल्यानंतर जवळपासच्या लोकांनाही कुंकळळीत येऊन काम करून घेणे सुलभ ठरणार आहे.