नगरसेवकाची गोवा फॉरवर्डकडे हस्तक्षेपाची मागणी, समस्येकडे लक्ष देणार : सरदेसाई
प्रतिनिधी /मडगाव
कुंकळ्ळी पालिकेचे नगरसेवक उद्देश नाईक देसाई यांनी मंगळवारी गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांची भेट घेऊन त्यांना कुंकळ्ळी पालिकेत फायली गायब होण्याच्या प्रकारांची माहिती दिली आणि हे प्रकार बंद करण्यासाठी त्यांच्या हस्तक्षेपाची मागणी केली. नगरसेवक देसाई यांच्या दाव्यानुसार, पालिकेत फायली गायब होण्याच्या प्रकरणांमुळे जनतेमध्ये नाराजी आहे. आपण स्वतः पालिकेच्या संदर्भात दिलेले एक पत्रही गायब झाले असल्याची माहिती त्यांनी दिली.
गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस (संघटना) दुर्गादास कामतही यावेळी उपस्थित होते. गेल्या एक महिन्यापासून मी संबंधित कर्मचाऱयांना माझ्याकडून सादर करण्यात आलेल्या पत्राचा शोध घेण्यास सांगत आहे, परंतु त्यांना ते सापडत नाही. पालिका कर्मचाऱयांच्या अशा वागण्यामुळे लोकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जनतेच्या महत्त्वाच्या फायली गायब होत आहेत, अशी माहिती नाईक देसाई यांनी यावेळी दिली.
सरदेसाई यांनी त्यांना या समस्येबाबत पालिका प्रशासकांशी बोलण्याचे आश्वासन दिले. अशी चूक करणाऱयांवर कारवाई झाली पाहिजे. लोकांच्या फायली गायब होणे हे चुकीचे आहे. ही एक गंभीर समस्या आहे आणि म्हणूनच कुंकळ्ळीतील लोकांना न्याय मिळाला पाहिजे, असे फातोर्डाचे आमदार सरदेसाई म्हणाले.
पालिकेचे मुख्याधिकारी हे कार्यकारी प्रमुख असल्याने फायली हाताळण्यास ते जबाबदार असल्याचेही सरदेसाई म्हणाले. या भाजप सरकारप्रमाणे सत्ताधारी राजकारण्यांच्या इशाऱयावर काम करणारे अधिकारी सुस्त झाले आहेत आणि त्यांना कसलेच गांभीर्य नाही. या समस्येकडे लक्ष देणे आवश्यक आहे आणि गोवा फॉरवर्ड निश्चितपणे या समस्येकडे लक्ष देईल, असे सरदेसाई म्हणाले.