बाळ्ळीतील बैठकीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन, सुदेश भिसे हे युरी आलेमाव यांचे एजंट असल्याचा आरोप
प्रतिनिधी /कुंकळ्ळी
कुंकळ्ळीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढविणारे सुदेश भिसे हे काँग्रेस उमेदवार युरी आलेमाव यांचे एजंट असून त्यांच्यामुळे व अपक्ष उमेदवार संतोष फळदेसाईंमुळे मतविभागणी होणार आहे. ही मतविभागणी टाळा आणि तसे मतदारांना सांगा, असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बाळ्ळीत बोलताना कार्यकर्त्यांना केले. खरी लढत भाजपचे उमेदवार क्लाफासियो डायस आणि तृणमूलचे जर्सन फर्नांडिस यांच्यातच होईल असे स्पष्ट संकेत मिळत आहेत, असेही यावेळी सांगण्यात आले.
मुख्यमंत्री सावंत यांनी सोमवारी दुपारी बाळ्ळी पंचायतीच्या चार प्रभागांतील भाजपच्या कार्यकर्त्यांशी पेरिमळ येथील बैठकीत संवाद साधला. सुदेश भिसे व संतोष फळदेसाई हे निवडून तर येणार नाहीत. त्यांच्यामुळे होणाऱया मतविभागणीतून युरी आलेमावना फायदा पोहोचेल, असा दावा त्यांनी केला. याआधी भिसे यांच्याशी मी बोलताना पक्षात किंवा सरकारकडून त्यांना योग्य स्थान दिले जाईल असे स्पष्ट केले होते. मात्र त्यांनी युरींची ऑफर वजनदार वाटली असावी. भिसे हे नावापुरतेच भाजपात होते, अशी टीका सावंत यांनी पुढे केली. संतोष फळदेसाई हे मतविभाजनासाठीच निवडणूक लढवत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
स्वाभिमानी कुंकळ्ळीकर कदापि भूलथापांना बळी पडणार नाहीत. ते भाजपचे उमेदवार डायस यांनाच निवडून आणतील असा ठाम विश्वास सावंत यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी पंचायतीच्या चार प्रभागांतील कार्यकर्ते व मतदारसंघातील बूथ प्रमुख, निवडणूक समिती प्रमुख आणि इतर कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केले. सावंत यांनी मतदारसंघातील बूथवार प्रगतीचा आढावा घेतला. सविस्तर माहिती देण्याची सूचना त्यांनी यावेळी उपस्थित असलेले कुंकळ्ळीचे निवडणूक प्रभारी योगेश सागर यांना केली.
यावेळी राजू कोरारडे व राज्य समिती सदस्या अलका पोतदार, उमेदवार क्लाफासियो डायस, गिरदोली जिल्हा पंचायत सदस्य संजना वेळीप, सरपंच राजू गोसावी व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच उपसरपंच वंदना गावकर, पंच विष्णू नाईक, दिपाली फळदेसाई, आंबावली सरपंच जासिंता डायस, नगरसेवक विदेश देसाई, विशाल देसाई, राहुल देसाई, पोलिता कारनेरो, रूपा गावकर व इतर उपस्थित होते. मुख्यमंत्री सावंत यांचे सरपंच गोसावी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर बाळ्ळी ब्रह्मपेड येथे जाऊन मुख्यमंत्री सावंत यांनी श्रींचे दर्शन व आशीर्वाद घेतला. पुजारी विठ्ठलदास कामत यांनी याप्रसंगी देवाला सांगणे केले. यावेळी सरपंच राजू गोसावी, अलका पोतदार व इतर कार्यकर्ते उपस्थित होते .