फोंडा पोलिसांच्या ‘त्या’ वादग्रस्त सिंगम उपनिरीक्षकाचे कारनामे : चित्रापूर मठाच्या नावाने बळकावली कोमुनिदाद जागा
प्रतिनिधी /फोंडा
कुंडई येथे कोमुनिदाद जागेत एका कर्नाटकस्थित मठाच्या नावाने बेकायदेशीररित्या फार्महाऊस उभारल्याचा दावा काही नागरिकांनी केला होता. त्यानंतर सर्वेक्षणासाठी आलेल्या गट विकास अधिकारी टिम पाहणी करत असताना विनानोटीस भलताच अधिकारी हजर राहिला. त्यामुळे मोठा राडा झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. त्यानंतर फोंडा पोलिसाच्या एका कनिष्ठ अधिकाऱयाने त्याला पोलीस बंदोबस्तात बाहेर काढल्याने सर्व पोलिसानांही शर्मेने मान खाली घालावी लागली.
प्राप्त माहितीनुसार पुंडई येथे एका कोमुनिदादच्या जागेत बेकायदेशीररित्या फार्महाऊस उभारल्याने ग्रामसभेत विषय चर्चेत आला होता. त्यानंतर त्या जागेत बांधकामाविषयी कागदपत्रे व पंचनामा करण्यासाठी गट विकास अधिकारी परवार यांच्या मार्गदर्शनाखाली दि. सोमवार दि. 14 मार्च हा दिवस ठरला होता. मात्र नेमक्या याचवेळी विनानोटीस अन्य एका खात्यातील सरकारी अधिकारी हजर राहिल्यामुळे मोठा राडा निर्माण झाला. फोंडा पोलिसांना घटनास्थळी अधिक फौजफाटा बोलवावा लागला. यावेळी एका उपनिरीक्षकाने सर्व परिस्थिती हाताळत संतप्त ग्रामस्थाना समजविले, तसेच हजर असलेल्या त्या अधिकाऱयाला नागरिकांना आपण का हजर होतो याचे उत्तर द्यावे अशी विनवणी करण्यात यश मिळवले.
फोंडय़ात परत वादग्रस्त उपनिरीक्षकाचे कारनामे
पोलीस निरीक्षकाने कायदा व सुव्यवस्था बिगडू नये म्हणून पाठवून दिलेल्या अन्य एका वादग्रस्त उपनिरीक्षकाने आपले कारनामे परत एकदा फेंडय़ात सुरू केले आहेत. घटनास्थळावर प्रथम हजर असलेल्या उपनिरीक्षकाला न जुमानता आपला रूबाब दाखवत तळमजल्यावर असलेल्या त्या अधिकाऱयाला सरळ पोलीस बंदोबस्तात बाहेर काढण्याचा पराक्रम करून दाखविला खरा, परंतू ग्रामस्थांचा रोष संपूर्ण पोलीस टिमला पत्कारावा लागला. ग्रामस्थांनी शाब्दिक मार देत वादग्रस्त पोलीस उपनिरीक्षकाला जेरीस आणले. सोशल मीडियावर सध्या ही क्लीप बरीच व्हायरल झाली असून घटनास्थळावर उपस्थित असलेल्या त्या अधिकाऱयाच्या माहिती हक्क कायद्याखाली मिळवलेल्या शैक्षणिक पात्रतेविषयी टिप्पणी सोशल मीडियावर सुरू आहे.
टीसीपीची परवानगी कशी मिळवली? कोमुनिदाद जागा बळकावली
सदर फार्महाऊसची बांधणी करीत असताना टीसीपी खात्याची परवानगी कशी मिळवली याचेही आश्चर्य व्यक्त केले आहे. मठाच्या नावाने 28 खांबाचा बंगला उभारलेला आहे. एक कुपनलिका (बोअरवेल) विनापरवाना उभारल्याचा दावा केला असून भविष्यात मडकई व कुंडई ग्रामस्थांना पाण्याची टंचाई उद्भवण्याची शक्यता वर्तविली आहे. या फार्महाऊसवर महाराष्ट्र, कर्नाटकांची वाहने ये-जा करीत असतात. उशिरा रात्री कोणते खेळ चालतात यावर ग्रामस्थ अनभिज्ञ असून सर्व सरकारी यंत्रणांनी कानाडोळा केलेला आहे. बेकायदशीरित्या उभारलेल्या बंगल्यास्थळी खासगी मालमत्ता म्हणून सूचनाफलक उभारलेला आहे. तसेच याला स्थानिक पातळीवर राजकीय वरदहस्तही लाभत असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे. दरम्यान गटविकास अधिकाऱयानी घटनास्थळावर सर्वेक्षण केले असून त्याचा अहवाल येत्या दिवसात मिळणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.