प्रतिनिधी / बेळगाव
एखाद्या कलेच्या छंदामधून उद्योग निर्माण होतो तेव्हा त्यातून अनेकांच्या हाताला काम मिळते. बेळगावात बरीच वर्षे असलेल्या आणि चित्रकला जोपासणाऱया कुंदाताई किर्लोस्कर यांचे स्वप्नसुद्धा महिलांना उद्योग मिळावा असेच होते. अलीकडेच त्यांचे निधन झाले. मात्र त्यांच्या कन्या पूर्णिमा किर्लोस्कर-सैनी यांनी आपल्या आईचे स्वप्न साकारण्यासाठी ‘कुंदकला’ या नावाने कार्यशाळा सुरू करून महिलांना शिलाईचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. यासाठी आविष्कार महिला उद्योजक संस्थेचे साहाय्य घेण्यात आले आहे.
पूर्णिमा सध्या लंडनमध्ये असून तेथून त्यांनी या कार्यशाळेचे नियोजन केले आहे. शुक्रवारी सकाळी विजयनगर हिंडलगा येथे या कार्यशाळेचे उद्घाटन झाले. कुंदा किर्लोस्कर यांच्या मैत्रिण असणाऱया लता कित्तूर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. विशेष म्हणजे अनेक वर्षांपासून कुंदाताईंच्या मदतीस असणाऱया विमल मांडवकर या आजी व रेणुका खोत यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी लता कित्तूर म्हणाल्या, किर्लोस्कर व कित्तूर कुटुंबाचा पूर्वापार परिचय होता. जलतरण शिबिरांमुळे माझा कुंदा यांच्याशी स्नेह वाढला. त्या उत्तम चित्रकार होत्या आणि महिलांनी सक्षम व्हावे, असे त्यांना नेहमीच वाटत असे. कोरोनाकाळात सुद्धा त्यांनी अनेक चित्राकृती तयार केल्या. त्यांच्या इच्छेचा मान ठेवून पूर्णिमा यांनी सुरू केलेला हा उपक्रम स्वागतार्ह आहे.
झूमच्या माध्यमातून बोलताना पूर्णिमा यांनी लता कित्तूर व आविष्कार संस्था यांना धन्यवाद दिले. महिलांची प्रगती व्हावी, असे आईला नेहमीच वाटत होते. तिच्याच चित्राकृतींचा वापर करून कपडय़ाच्या विविध वस्तू तयार कराव्यात आणि त्याला बाजारपेठ मिळवून द्यावी, या हेतूने कुंदकला आर्ट ही संस्था सुरू करण्यात आली आहे.
या कार्यशाळेत सुवर्णा लोकोळकर व आदिती गुरव या महिलांना मास्क, कोस्टर, ऍप्रेन आदी प्रशिक्षण देणार आहेत. त्यांना सुचेता इनामदार यांचे मार्गदर्शन लाभले आहे. जांबोटी येथील पूजा कुंभार, अनुराधा जामदार, स्वाती गोवेकर तसेच बेळगावच्या अलका पाटील व शैलश्री या प्रशिक्षण घेत आहेत. यावेळी समीर तेंडोलकर, उमेश कलघटगी, गीता कित्तूर तसेच आविष्कारच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.