डेहराडून / वृत्तसंस्था
हरिद्वार येथील कुंभमेळय़ात सहभागी झालेल्या भाविकांपैकी 1 हजार 700 हून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले आहे. कुंभमेळय़ाचे दुसरे शाही स्नान दोन दिवसांपूर्वी पार पडले. त्यात 30 लाखांहून अधिक भाविकांनी भाग घेतला. आता हे भाविक आपापल्या गावी परतत आहेत. या गावांमध्ये कोरोना पसरण्याची चिंता व्यक्त होत असून सतर्क रहा असे स्पष्ट करण्यात आले.
कुंभमेळय़ाला येणाऱयांच्या चाचण्या करण्यासाठी उत्तराखंड प्रशासनाने सज्जता ठेवली होती. कुंभमेळय़ाची व्याप्ती हरिद्वारपासून देवप्रयाग पर्यंत होती. उत्तर भारतातील अनेक आखाडय़ांचे प्रमुख, विविध पंथांचे साधूसंत, त्यांचे अनुयायी आणि इतर सामान्य भाविक यांनी ही पर्वणी साधण्यासाठी गर्दी केली होती. त्यापैकी सर्वांच्या चाचण्या करणे शक्य नव्हते. मात्र, जास्तीत जास्त लोकांच्या चाचण्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ज्यांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले होते, त्यांना वेगळे करून उपचार करण्यात आले.
सोमवती अमावस्या (12 एप्रिल) आणि मेष संक्रांती (14 एप्रिल) या दोन पवित्र दिवसांमध्ये एकंदर 48 लाख 51 हजारांहून अधिक भाविकांनी शाही स्नान केले. बहुतेक भाविकांनी कोरोना नियमांचे पालन केले नाही, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. शारिरीक अंतर आणि मास्कचा उपयोग याकडे सर्रास दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी, पुढे काय होणार याची चिंता लागून राहिल्याचे तज्ञांनी स्पष्ट केले. तरीही कुंभमेळा प्रशासनाने परंपरेनुसार आखाडय़ांची विभागणी करून त्यांना वेगवेगळय़ा वेळी शाही स्नानासाठी पाठविण्याची व्यवस्था केली.
लसीकरण वाढविणार कुंभमेळय़ातील भाविकांना लस देण्याचीही सज्जता प्रशासनाने केली आहे. अनेकांचे लसीकरण करण्यात आले. आगामी दिवसांमध्येही आखाडय़ांचे प्रमुख आणि अनुयायी तसेच सर्वसामान्य भाविक यांच्या लसीकरणाची गती वाढविण्यासाठी अधिक प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच अधिकाधिक भाविकांची कोरोना चाचणीही केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.