शेकडो समर्थकांसह तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल
प्रतिनिधी /कुंभारजुवे
कुंभारजुवे येथील समाजकार्यकर्ते, वीस वर्षे पंच असणारे आणि दोनवेळा कुंभारजुवेचे सरपंचपदावरुन कार्य केलेले सुरेंद्र नाईक यांनी काल रविवारी कुंभारजुवे मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसचे उमेदवार समिल वळवईकर यांना पाठिंबा जाहीर करुन त्यांना विजयी करण्यासाठी झटण्याचा निर्धार व्यक्त केला.
समिल वळवईकर यांच्या खोर्ली येथील कार्यालयात हा पक्ष प्रवेश झाला. यावेळी वळवईकर यांनी पक्षाची शाल व झेंडा प्रदान करुन त्यांचे पक्षात स्वागत केले. त्यांचे समर्थक कार्यर्तेही यावेळी तृणमूलमध्ये सहभागी झाले. यावेळी तृणमूलचे पदाधिकारी एन. शिवदास व अन्य उपस्थित होते. कोरोना संसर्गामुळे निवडणूक आयोगाने घातलेले निर्बंध पाळून हा कार्यक्रम झाला.
यावेळी बोलताना सुरेंद्र नाईक म्हणाले की कुंभारजुवे मतदारसंघात टिएमसीचे समिल वळवईकर हा सर्वोत्तम उमेदवार आहे. ते सुशिक्षित असून त्यांना समाजसेवेचा आणि कुंभारजुवेच्या स्थानिक राजकारणाचा वीस वर्षांचा चांगला अनुभव आहे. ते सरळ मनाचे असून सर्वांशी ते आपुलकीने वागतात. जात, धर्म किंवा अन्य कोणताच भेद ते कुणाशी करत नाहीत. सर्वांच्या मदतीला ते धाऊन जातात. त्यांच्यासारखा सर्वोत्तम उमेदवार कुंभारजुवेला पहिल्यांदाच मिळत असून येत्या निवडणुकीत त्यांचा विजय होऊन, ते आमदार बनतील, असा आपला विश्वास आहे.
भाजप हा आता भाजप पक्ष राहिला नसून ती मिक्स भाजी झालेली आहे. मतदारांना किमंत नाही. मंत्री फक्त स्वतःच्या मतदासंघांतच नोकऱया देतात. अशामुळे कुंभारजुवेत बेरोजगारी मोठी वाढली आहे. मोठय़ा प्रमाणात रोजगारर संधी उपलब्ध करण्यासाठी समिल वळवईकर आमदार बनणे आवश्यक आहे, असेही नाईक म्हणाले.
समिल वळवईकर म्हणाले की आपण गेल्या वीस वर्षांत कुंभारजुवे मतदारसंघातील सर्व पंचायत क्षेत्रांतील लोकांच्या संपर्कात राहिलो, जमेल ती लोकांची कामे करुन दिली त्याची पोचपावती आपणास आता या निवडणुकीत मिळत आहे. कोरोनाच्या दोन्ही आणि आता तिसऱया लाटेतही आपल्याला लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली. आपले कार्यकर्ते व आपण स्वतः लोकांना मदत करणे हे आपले कर्तव्य मानून कार्य केले. आतापर्यंत संपूर्ण मतदासंघात तीन दौरे पूर्ण झाले असून सर्वत्र आपल्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे आपला विजय नक्कीच होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.