भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांना विश्वास,सां.मातीयश व सांतइस्तेव टोकवाडा येथे सभा
प्रतिनिधी /कुंभारजुवे
कुंभारजुवेचे आमदार पांडुरंग मडकईकर तसेच भाजपचे अन्य मंडळ पदाधिकारी समवेत कुंभारजुवे मतदारसंघातल्या सर्व पंचायतींचा दौरा करणार आहोत. यावेळी सरकारच्या विविध योजनांची माहिती देणार आहोत. भाजपने आपल्या कारकिर्दीत अनेक विकासकामे केली आहेत. शिवाय ज्या सर्वसामान्य घटकांसाठी येथे अंमलात आणलेल्या विविध योजना अन्य राज्यात कुठेच नाहीत. त्याचे पूर्ण श्रेय तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांना जाते. गोव्यात 2022 निवडणुकीत भाजपचे सरकार यावे अशी लोकांची इच्छा आहे. त्यामुळे बहुमताने भाजप सत्तेवर येईल व कुंभारजुवे मतदारसंघात कमळच फुलेल, असा विश्वास गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी व्यक्त केला.
सां. मातीयस पंचायत क्षेत्रातल्या पहिल्या सभेत ते बोलत होते. प्रारंभी दिवाडी येथील ॐ शक्ती विनायक मंदिरात दिवाडी फेरी ते मंदीर पर्यंत ढोल ताशांच्या मिरवणुकीने सदानंद शेट तानावडे यांचे आगमन झाले त्यानंतर उपस्थित मान्यवरांसमवेत श्रींचे दर्शन घेतले.
या प्रसंगी सभेच्या व्यासपीठावर कुंभारजुवेचे आमदार पांडुरंग मडकईकर, खोर्लीचे जिल्हा पंचायत सदस्य सिद्धेश नाईक, सेंट लॉरेन्सेच जिल्हा पंचायत सदस्य धाकू मडकईकर, सा. मातीयस पंचायतीचे सरपंच मोहन वळवईकर, कुंभारजुवे भाजप मंडळ अध्यक्ष चंदन वरगावकर, उपाध्यक्ष डॉ. विनोद वेरेकर, कुंभारजुवे भाजप महिला मोर्चा अध्यक्ष शिल्पा वांतेकर आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचे रोहिदास दिवाडकर, भूषण भोमकर, महिमा देसाई यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
कोरोना काळात कार्यकर्त्यांचे अभिनंदनीय कार्य
भाजप पक्षात सर्व धर्माचे लोक पदाधिकारी, आमदार, मंत्री म्हणून कार्यरत आहेत. या दौऱयादरम्यान लोकांकडून त्यांची मतेही आम्ही जाणून घेणार आहोत. आमच्या पक्षाचे कार्यकर्ते सदा सर्वदा लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध असतात. कोरोना महामारीच्या काळात आमच्या कार्यकर्त्यांनी अभिनंदनीय कार्य केले आहे. तसेच लोकांसाठी आमच्या शासनाने उत्कृष्ट काम केलेले आहे. सध्या गोव्यात व देशातही भाजप शिवाय पर्याय नाही. त्यामुळे 2022 च्या निवडणुकीत बहुमताने भाजप सत्तेवर येईल व कुंभारजुवे मतदारसंघात कमळच फुलेल असे तानावडे म्हणाले.
जनतेच्या आशीर्वादानेच जिंकून येण्याचा विश्वास : पांडुरंग मडकईकर
तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली मला काम करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य समजतो. त्यांच्याच कार्यकाळापासून गोव्यात विविध विकासकामांचा धडाका सुरू झाला. माझ्या मतदारसंघात कित्येक विकासकामे चालीस लावून पूर्णही केली. आज त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत विकासकामे करीत आहेत. लोकांच्या आशीर्वादाने विधानसभा निवडणुकीत उभा राहून जिंकूनही येण्याचा विश्वास तुमच्यामुळेच आहे, असे कुंभारजुवेचे पांडुरंग मडकईकर यांनी सांगितले.
जनतमुळेच विजयी : सिद्धेश नाईक
भाजप कार्यकर्ते सदोदीत कार्यरत असतात. त्यामुळे पक्षाचे कुठलेही काम आम्ही करीत असतो. भाजपच्या काळात गोव्यात पुष्कळ विकासकामे झाली. त्यामुळे लोक भाजपकडे आशेने बघतात. जनतमुळेच जिल्हा पंचायत निवडणुकीत निवडून आलो, असे जिल्हा पंचायत सदस्य सिद्धेश नाईक म्हणाले.
या प्रसंगी सरपंच मोहन वळवईकर, जिल्हा पंचायत सदस्य धाकू मडकईकर यांची समयोचित भाषणे झाली. सूत्रसंचालन मंदा केरकर व आभार शिल्पा वांतेकर यांनी मानले.
दरम्यान सांतइस्तेव टोकवाडा येथे शांतादुर्गा रवळनाथ सभामंडपात सभा झाली. यावेळी व्यासपीठावर भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानवडे, कुंभारजुवेचे आमदार पांडुरंग मडकईकर, खोर्ली जिल्हा पंचायत सदस्य सिद्धेश नाईक, सेंट लॉरेन्सो जिल्हा पंचायत सदस्य धाकू मडकईकर, भाजप कुंभारजुवे मंडळ उपाध्यक्ष तथा जुने गोवेच्या सरपंच जनिता मडकईकर, आखाडाचे पंच सदस्य सुरेंद्र वळवईकर, कुंभारजुवे भाजप मंडळ अध्यक्ष चंदन वरगावकर, उपाध्यक्ष डॉ. विनोद वेरेकर, सरचिटणीस भूषण भोमकर, कुंभारजुवे महिला मोर्चा अध्यक्ष शिल्पा वांतेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सदानंद तानावडे, पांडुरंग मडकईकर, सिद्धेश नाईक यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुकर चोडणकर, आभार रामानंद चोडणकर यांनी मानले. यावेळी येथील पारंपरिक रेतीवाल्यांचा तसेच विकासकामे व नोकरी विषयी प्रश्नाला सदानंद तानावडे यांनी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.