प्रतिनिधी / कुंभारजुवे
कुंभारजुवे येथे मुंबई व पुण्याहून लग्नासाठी आलेल्यांना एकूण पाचजणांना कोरोनाची लागण झाल्याचे सापडल्याने, पंचायतीने लॉकडाउनच्या केलेल्या आवाहनाला लोकांनी उत्तम प्रतिसाद देऊन दुकाने, मासळी मार्केट, बँक, फेरीबोट व अन्य आस्थापने बंद ठेवली. कुभारजुवेच्या प्रवेशद्वाराशी पुलावर बॅरीकेट घालून व काटेरी झाडे टाकून रस्त्यावरून जाणे बंद केले होते ते जूने गोवे पोलिसांनी येऊन रस्ता बंद करता येत नाही ही सबब सांगून रस्ता मोकळा केला तीन दिवस हा लॉकडाऊन आहे.
कुंभारजुवे येथे लग्नासाठी, मुंबईहून एक कुटुंब व पुण्याहून एक महिला आली होती. जागृत नागरिकांनी त्यांच्या येण्या विषयी आरोग्य खात्याला त्वरित कळविले. व त्यांची तपासणी केली असता ते कोरोना बाधीत सापडले व कुंभारजुवे गावात खळबळ माजली, पंचायतीने या कामी पुढाकार घेऊन इथे तीन दिवशीय लॉकडाऊन करण्याचे निश्चीत केले.
आज 13 जून रोजी युवकांनी कुंभारजुवेच्या प्रवेशद्वारांशी बॅरिकेट्स व काटेरी झाडे घालून रस्ता बंद केला. याची कल्पना जूने गोवे पोलीस स्थानकाला येताच, पोलीस निरीक्षक कृष्णा सिनारी यांनी घटनास्थळी भेट देऊन जिल्हाधिकाऱयांच्या पूर्व परवानगीशिवाय रस्ता अडविणे कायदेशीर नाही असे सांगून अडथळा दूर करण्यात सांगितले.
आजपासून सुरू झालेल्या या तीन दिवशीय लॉकडाऊनला लोकांनी स्वयंस्फूर्तीने चांगला प्रतिसाद दिलेला आहे व आम्ही तो तीन दिवस नक्की पाळू असे नागरिकांनी स्पष्ट केले. सद्या मुंबईच्या कुटुंबातले चार व पुण्याची एक महिला मिळून पाच कोरोना बाधित रुग्ण झालेले आहेत. त्यामुळे नागरिकांनी स्वतःला कोरोनटाईन करून घेऊन दुकाने, मासळी मार्केट, बँक, फेरीबोट अन्य आस्थापने बंद पेलेली आहेत. सदर लॉकडाऊन 15 जूनपर्यंत आहे तेव्हा सर्वांनी या तीन दिवशीय लॉकडाऊनला पूर्ण सहकार्य करून खबरदारी घ्यावी असे आवाहन पंचायत मंडळातर्फे करण्यात येत आहे.