प्रतिनिधी / वाकरे
कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याने हंगाम २०१९-२० मध्ये कारखान्याला ऊस पुरवठा केलेल्या ऊस उत्पादकांना देय असणारी प्रतिटन २९२९ रुपयेप्रमाणे होणारी दि.३१ जानेवारीअखेरची एफआरपी ऊस उत्पादक सभासद, बिगर सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग केल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.
कुंभी कारखान्याची हंगाम २०१९-२० ची एफआरपी प्रतिटन २९२९ रुपयेप्रमाणे होते. कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाल्यापासून ३१ जानेवारीअखेर गाळप केलेल्या ऊसाची एकरक्कमी २९२९ रुपये संपूर्ण एफआरपी रक्कम ऊस पुरवठाधारक शेतकऱ्यांच्या बँकेच्या बचत खात्यात वर्ग केली आहे. इथून पुढे हंगामअखेर आलेल्या ऊसाची प्रतिटन २९२९ रुपयेप्रमाणे एफआरपी लवकरच आदा करण्यात येणार असल्याचे चेअरमन नरके यांनी सांगितले. सध्या कोरोना विषाणूमुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सर्वत्र लॉक डाऊन असून कारखान्याच्या ऊस उत्पादकांनी घरीच राहावे आणि सुरक्षित राहावे असे आवाहन चेअरमन नरके यांनी केले आहे.
४८.०८ कोटी एफआरपी देय-चेअरमन नरके यांचा खुलासा
चेअरमन चंद्रदीप नरके यांनी शुक्रवारी दै. तरुण भारत मध्ये आलेल्या ६३.५३ लाख इतकी थकित एफआरपी ची आकडेवारी चुकीची असून कारखाना ऊस उत्पादकांना ४८.०८ कोटी रुपये एफआरपी देय असल्याचे सांगितले.लवकरच ती रक्कम ऊस उत्पादकांना आदा करण्यात येणार असल्याचा खुलासा त्यांनी केला.