गळा चिरून केली हत्या : संशयित आरोप फरारी : परिसरात उडाली खळबळ
वार्ताहर/ कुकुडवाड
कुकुडवाड (कारंडेवाडी) ता. माण येथे पुतण्याने चुलत्याचा झोपेतच पहाटेच्या वेळी गळा चिरुन निर्घृण खून केल्याची घटना घडल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या वातावरणात गावात एकच खळबळ उडाली. लक्ष्मण चव्हाण असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान संशयित आरोपी फरारी झाला असून पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.
याबाबत घटनास्थळावरुन व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कुकुडवाड शेजारील कारंडे गोठय़ावर हे चव्हाण कुटूंब गेले अनेक वर्षे रहात आहेत. यामधील काहीजण कामासाठी परगावी राहतात. कारंडे गोठय़ावर सध्या वसंत चव्हाण, त्याची पत्नी मुले रहात होती. त्यांच्या समवेत हा लक्ष्मण चव्हाण रहात होता. लक्ष्मण चव्हाण यास दोन पत्नी असून त्यासुद्धा परगावी असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे.
त्यामध्ये लक्ष्मण चव्हाण हा गेली काही वर्षे अर्धांगवायू आजाराने ग्रासलेला होता. तो त्याचा भाऊ वसंतकडे रहात होता. सोमवारी पहाटे वसंत व लक्ष्मण बाहेर अंगणात झोपले होते. लक्ष्मणचा पुतण्या संदीप चव्हाण घरात झोपले होता. पहाटेच्या वेळी पुतण्या संशयित संदीपने चुलता लक्ष्मण याचा झोपेतच गळा चिरून निर्घृणपणे खून केला व तो फरारी झाल्याची माहिती चव्हाण कुटुंबियांनी पोलिसांना दिली. ही घटना समजताच म्हसवड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमोडे, उपनिरीक्षक अजय कदम यांनी त्यांच्या सहकाऱयांसमवेत तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
यावेळी घटनास्थळी रक्ताची पाऊले उमटली असल्याने ज्या दिशेने पाऊले उमटले होती त्या दिशेने पोलिसांनी सरपंच, पोलीस पाटील व नागरिकासह फरार संशयित आरोपी संदीप चव्हाण यांचा शोध घेण्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो मिळून आला नाही. मात्र एक ठिकाणी वस्तीपासून काही अंतरावर मक्याच्या शेतात तो झोपला असल्याचे निदर्शनास आले असून त्याठिकाणी आरोपीचे पैशाचे पॉकेट सापडल्याचे पोलिसांनी सांगितले.
त्या पॉकेटमध्ये एक फोटो सापडला असून तो आरोपीच्या पत्नीचा असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. दरम्यान माण खटावचे उपविभागीय पोलीस अधिकारी बी. बी. महामुनी यांनी घटनास्थळी भेट दिली व पाहणी करून पुढील तपासाचे आदेश दिले आहेत. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे. म्हसवड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमोडे या गुन्हय़ाचा अधिक तपास करीत आहेत.