ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांच्या हत्येला जबाबदार मुख्य आरोपी विकास दुबे याला पोलिसांनी मध्य प्रदेशातील उज्जैन येथून अटक केली आहे. विकासच्या पाच साथीदारांचे पोलिसांनी एन्काऊंटर केले. त्यातील त्याच्या तीन साथीदारांना काल तर दोन साथीदारांना आज ठार करण्यात आले.
कानपूर येथे अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर विकास दुबे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. या गोळीबारात आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून विकास दुबे फरार होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. त्याला पकडण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी 5 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. अखेर आज त्याला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विकास दुबे मध्यप्रदेशातील महाकाल मंदिरात पूजा आणि दर्शनासाठी असलेल्या रांगेत उभा होता. त्याने ओरडून ओरडून स्वतः विकास दुबे असल्याचे सांगितले. नंतर मंदिर परिसरात असलेल्या सुरक्षागार्डनी त्याला पकडले आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली. विकास दुबेला उज्जैन मधल्या फ्रिंगज पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तिथून त्याला अज्ञात स्थळी नेण्यात आले आहे.