म्हापसा परिसरात माजली खळबळ : अवघ्या तासाभरात दोघांना अटक : पर्वरी खुनानंतरची दुसरे प्रकरण
प्रतिनिधी / म्हापसा
कुचेली येथे श्री साईबाबा मंदिराच्या बाजुलाच असलेल्या निर्जन स्थळी राजेश शेटकर (49) या कुचेली येथील रहिवाशाला जाळून मारण्याची घटना काल सोमवारी दुपारी उघडकीस आल्याने म्हापसा पोलिसांची झोपच उडून गेली आहे. म्हापसा पोलीस स्थानकाचे निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी सलीम खन्ना नदाफ, रुपेश महाले या संशयितांना अवघ्या तासाभरात अटक करण्यात यश मिळविले. पोलीस अधीक्षक सुबीत सक्सेना यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करुन मार्गदर्शन केले. हा खून पूर्ववैमनस्यातून झाल्याचे प्राथमिक तपासणीत उघड झाले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सायं. 6 वाजण्याच्या दरम्यान सलीम खन्ना नदाफ, रुपेश महाले व राजेश शेटकर या तिघांनीही कुचेली येथील प्रार्थना बारमध्ये मद्यसेवन केले. तेथे बाजूलाच असलेल्या मासे विक्रेत्याकडून मासे विकत घेतले. तिघेही बिअरच्या बाटल्या हातात घेऊन तसेच मासे घेऊन फिरताना आजुबाजूच्या लोकांनी पाहिले होते. अंदाजे 10 वाजण्याच्या सुमारास तिघेही एकाच मोटरसायकलवरून बाजूच्या निर्जनस्थळी गेले. तेथे त्या तिघांनी मिळून मासे भाजले व फस्तही केले.
गवताची गंजी व कपडे घालून जाळले
म्हापसा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपींनी राजेशला प्रथम लाथाबुक्यानी मारहाण केली. तिघांनीही अती दारू फस्त केल्याने तिघेही उभे राहण्याच्या परिस्थितीत नव्हते. सलीम याला राजेशचा राग होता. या रागाच्या भरात त्याने पूर्वनियोजित आपला डाव साधल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनास्थळी तिघांनीही मासे खाल्ले. त्यानंतर राजेश बरोबर भांडण करून त्याला लाथाबुक्यानी मारहाण केली. सलीमने तेथे बाजूला असलेल्या गवताच्या गंजी काढल्या व गुप्त भागावर टाकल्या. त्यानंतर तेथे कचऱयात पडलेले कपडे आणून त्याच्यावर टाकले व त्याला पेटवून दिले.
आग लावून संशयितांनी काढला पळ
राजेशने अती दारू प्याल्याने त्याला उठणेही कठीम होते. आग लावल्यानंतर सलीम व रुपेश या संशयितांनी तेथून पळ काढला. ही घटना रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान घडली असल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे राजेशच्या अंगावरचे सर्व कपडे काढून टाकण्यात आले. फक्त हाफपेंट अंगावर होती, अशी माहिती रुपेशच्या जबानीत नोंद आहे.
राजेशला इस्पितळात नेत असताना मृत्यू
रविवारी रात्री 11 वा. राजेशला आग लावली होती. त्याचा मृत्यू सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान झाल्याचे पोलिसांनी सांगितले. येथील एक महिला त्या भागात गेली असता तिला राजेश जळलेल्या अवस्थेत पडल्याचे आढळून आले. त्याचे पाय हालत होते, तिने घटनेची माहिती गावातील लोकांना दिल्यावर त्वरित ही माहिती म्हापसा पोलिसांना देण्यात आली. रुग्णवाहिकेच्या सहाय्याने त्याला म्हापसा जिल्हा आझिलो इस्पितळात नेण्यात आले, मात्र वाटेवरच त्याचे निधन झाले. डय़ुटीवरील डॉक्टरांनी राजेशला मरण आल्याचे घोषित केले.
पोलिसांनी संशयित आरोपी सलीम यांच्या यापूर्वीच्या गुन्हय़ांची तपासणी केली असता सलीमवर 2016 व 2017 मध्ये दंगल व अपघाताचे गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी दिली. मयत राजेश बरोबर त्याची पूर्वीची दुश्मनी होती त्यातूनच हा खून झाल्याचे उघडकीस आले आहे.
पर्वरी खुनातील अद्याप मास्टरमाईंडचा पत्ता नाही
महिन्यापूर्वीच पर्वरी येथे बिल्डर मेथर खून प्रकरणानंतर बार्देशात पुन्हा एकदा जाळून खून केल्याची घटना आता उघडकीस आली आहे. कुचेली म्हापसा येथे झालेल्या या जाळपोळ व खून प्रकरणानंतर आता पोलिसांबाबात पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. म्हापशातील खून प्रकरणाचा छडा म्हापसा पोलिसांनी तासभरात लावला असला तरी मेथर खून प्रकरणातील मास्टर माईंडला अद्याप अटक होणे बाकी आहे. मुख्यमंत्र्यांनीही मास्टर माईंडला अटक करण्यात येईल असे आश्वासन दिले असले तरी अद्याप मास्टर माईंडला अटक झालेली नाही. मयत राजेश शेटकर विवाहित असून तो दरवेळी दारूच्या नशेत असायचा अशी माहिती तपासात उघड झाली आहे. पूर्वी तो ड्रायव्हर म्हणून काम पाहत होता त्याला दोन अविवाहित बहिणीही आहेत.
पोलीस उपअधीक्षक गजानंद प्रभूदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक तुषार लोटलीकर, उपनिरीक्षक अनिल पोलेकर, आशिष परब, हवालदार आलविटा डिमेलो, सुशांत चोपडेकर, शिवाजी शेटकर, इरशाद वारंगी, फ्रँकी वाझ, राजेश कांदोळकर, अक्षय पाटील, दुमिंगो माटनेकर, सर्वेश मांद्रेकर, अभिषेक कासार, प्रकाश पोळेकर यांनी संशयित आरोपींना पकडण्यास यश मिळविले.
संशयित आरोपी सलीम अब्दुल नदाफ वय 24 रा. कुचेली मैदानाजवळ याला कळंगूट येथे तर रुपेश महाले वय 32 रा. कुचेली मैदान जवळ याला कोलवाळ येथे पोलिसांनी पकडले.