प्रकल्प लवकरच पूर्णत्वास नेण्याचे आश्वासन
प्रतिनिधी /पणजी
कुठ्ठाळी कला भवन प्रकल्प लवकरच पूर्णत्वास नेण्यात येईल. हा प्रकल्प राज्यासाठी एक आदर्श प्रकल्प ठरणार, असे आश्वासन आपच्या कुठ्ठाळीच्या उमेदवार अलिना साल्दाना यांनी दिले.
बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. कला भवन अनेक वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत होते. बांधकाम सुरू करताना आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कारण त्यात अनेक नियमांचा समावेश होता. तरीही आम्ही बांधकाम सुरू करू शकलो, असे साल्ढाना यांनी सांगितले.
कला भवनाला पालक विभाग नव्हता. त्यामुळेच आम्हाला दीड वर्षे लागली. आम्ही कला भवन पूर्णत्वाकडे ने आहोत. ते पूर्ण झाल्यावर कला आणि संस्कृती विभागाकडे सोपवले जाईल, असे त्या म्हणाल्या. कला भवन संगीत आणि चित्रकला वर्ग देईल, त्याचा फायदा कुठ्ठाळी आणि दक्षिण गोव्यातील लोकांना मोठय़ा प्रमाणात होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या विनंतीला प्रतिसाद देत हा प्रकल्प हाती घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनीच जीएसआयडीसीला प्रकल्प ताब्यात घेण्यास सांगितले. आम्ही उर्वरित 80 टक्के काम पूर्ण केले आहे. रंगकाम, वीज, आणि इतर सर्व आवश्यक कामे पूर्ण करायची होती. आम्ही दर्जेदार कामावर विश्वास ठेवतो आणि लवकरच हा प्रकल्प पूर्ण करू असेही त्या म्हणाल्या.