प्रतिनिधी / वास्को
कुठ्ठाळीतील मच्छीमारी जेटीवर नांगरून ठेवलेल्या एका ट्रॉलरला आग लागण्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली. या घटनेत त्या ट्रॉलरचे सुमारे पंधरा लाखांचे नुकसान झाले. अग्नीशामक दलाने इतर ट्रॉलर पेट घेण्यापासून वाचवले.
कुठ्ठाळीच्या फेरीबोट धक्क्यापासून जवळच असलेल्या मच्छीमारी जेटी अन्य काही मच्छीमारी ट्रॉलर नांगरून ठेवण्यात आले होते. संध्याकाळी सातच्या सुमारास एका ट्रॉलरला आग लागली. या ट्रॉलरच्या दोन्ही बाजुला दुसरे ट्रॉलर होते. त्या ट्रॉलरवरील खलाशांनी आग विझवीण्याचा प्रयत्न केला. अग्नीशामक दलाला या घटनेची माहिती मिळताच दल घटनास्थळी दाखल झाले. मात्र, त्यापूर्वीच तो ट्रॉलर अर्धाअधिक जळून खाक झाला. या आगीची झळ बाजुच्या दोन्ही ट्रॉलरना बसली. मात्र, अग्नीशामक दलाने ते ट्रॉलर वाचवले. आगीच्या घटनेवेळी त्या ट्रॉलरमध्ये कुणी नव्हते. आग भडकण्याचे निश्चित कारण स्पष्ट झालेले नाही. हा ट्रॉलर मडगाव येथील एका मत्स्य व्यवसायीकाचा आहे.