प्रतिनिधी /कुडचडे
दयानंद कला केंद्र गेली 55 वर्षे कुडचडे येथे कार्यरत असून गोव्यात झालेल्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक विकासाची साक्ष देणारी जुनी संस्था आहे. ही संस्था आयोजित करत असलेला चंदेरी महोत्सव ही गोव्याच्या कला-संस्कृतीचे भूषण आहे, ही आपणा सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपदान वीजमंत्री निलेश काब्राल यांनी केले. कुडचडे येथे दयानंद कला केंद्रातर्फे दि. 25 डिसेंबर ते 3 जानेवारीपर्यंत होणाऱया पाचव्या चंदेरी अन्न, संस्कृती व पर्यटन महोत्सवाच्या दैनंदिन कार्यक्रम पत्रिकेच्या अनावरणप्रसंगी काब्राल बोलत होते. श्री सातेरी देवी मंदिरात आयोजित या कार्यक्रमात आयोजन समितीतर्फे देवीला वंदन करुन हा महोत्सव यशस्वी व्हावा यासाठी पुरोहिताने देवीला गाऱहाणे घातले व आशीर्वाद घेतले. यावेळी चंदेरी महोत्सव आयोजन समिती अध्यक्ष मोर्तू नाईक, कुडचडे – काकोडा नगराध्यक्ष विश्वास सावंत, दयानंद केंद्राचे उपाध्यक्ष अशोक नाईक, कुडचडे भाजप मंडळाचे सचिव राजेंद्र नाईक, जयकुमार खांडेकर, कोषाध्यक्ष नवीन खांडेकर, नगरसेवक दामोदर भेंडे आदी उपस्थित होते. सचिव बंटी उडेलकर यांनी प्रस्तुत कार्यक्रमाची सविस्तर माहिती देऊन शेवटी आभार मानले.