प्रतिनिधी /कुडचडे
कुडचडेत सध्या विधानसभा निवडणूक प्रचार जोरात चालला असून त्यात काँग्रेस पक्षाचा पाठिंबा वाढत चालला असल्याचा दावा त्यांच्या नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. यातच काँग्रेस उमेदवार अमित पाटकर यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष बाळकृष्ण होडारकर यांनी प्रचारात उपस्थिती दाखविली आहे.
कुडचडेतील काँग्रेस उमेदवारीच्या दावेदारांमध्ये पाटकर यांच्यासोबत होडारकर व जिल्हा पंचायत निवडणुकीतील उमेदवार हर्षद गावस देसाई हेही होते. ज्या वेळेस उमेदवारी जाहीर करण्यात आली व पाटकर यांना प्रचाराला सुरुवात केली तेव्हा वरील दोन्ही इच्छुकांनी पाटकर यांना समर्थन देणार असल्याचे प्रसारमाध्यमांसमोर सांगितले होते. पण गेले कित्येक दिवस प्रचारात हे दोन्ही दावेदार न दिसल्यामुळे कुडचडेत चर्चा सुरू झाली होती. आता निवडणुकीस अवघे सहा दिवस राहिले असून प्रचार जोमात सुरू आहे. त्यात सोमवारी होडारकर हे पाटकर यांच्या घरोघरी प्रचारात सामील झाले.
प्रचारादरम्यान पाटकर यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, आजपर्यंत जो घरोघरी प्रचार सुरू आहे त्यात प्रत्येक घरातून जो प्रतिसाद लाभलेला आहे त्यावरून दिसून येते की, यावेळेस कुडचडेत काँग्रेस बहुमताने निवडून येणार. कुडचडेत लोकांनी गेली दहा वर्षे ज्या दबावाखाली दिवस काढले त्यातून सुटण्याची लोक वाट पाहत होते व आता ती वेळ आलेली आहे असे लोकांकडून सांगण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.
पाटकर यांना विजयी करणार : होडारकर
नगरसेवक होडारकर यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, ज्या वेळेस मी काँग्रेस तिकिटासाठी इच्छुक होतो तेव्हा जे कोणी माझ्यासोबत होते ते पक्ष म्हणून राहिले नव्हते, तर होडारकर म्हणून सोबत होते. तेव्हाही ते भाजपात होते व त्याप्रमाणे ते त्यांच्या पक्षात गेले आहेत. त्यावर आपल्याला काहीच बोलायचे नाही. कारण प्रत्येकाने स्वतःचा निर्णय हा स्वतः घ्यायचा असतो. त्याला आपण बदलू शकत नाही. पण मी काँग्रेसबरोबर राहणार यावर ठाम आहे व कुडचडेत यंदा काँग्रेस उमेदवार पाटकर यांना जिंकून देणार. त्याचबरोबर मी मुद्दाम सांगू इच्छितो की, यंदा राज्यातही काँग्रेस सरकार स्थापित होणार व त्यासाठी कुडचडेतील जनता पूर्ण सहकार्य करणार याचा आपल्याला पूर्ण विश्वास आहे, असे ते म्हणाले.