प्रतिनिधी / कुडचडे
कुडचडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारितील कोरोनाबाधितांची वाढती संख्या बघितल्यास कुडचडे कोणत्या दिशेने जात आहे हे सांगणे कठीण झाले आहे. त्यामुळे सरकारने राज्यातील इतर भागांबरोबर कुडचडेतील जनतेच्या सुरक्षेसाठी ठोस निर्णय घेण्याची गरज असून त्याची नीट अंमलबजावणी होणेही तेवढेच गरजेचे आहे, अशी मागणी आम आदमी पक्षाचे कुडचडेतील संयोजक जेम्स फर्नांडिस यांनी केली आहे.
सध्याची राज्याची स्थिती बघितली, तर सरकार अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक दिवशी बळींच्या संख्येत वाढ होत आहे. तरी सरकार पक्ष व खुर्ची सांभाळण्यात गुंतल्याचे दिसून येत आहे. आज मुख्यमंत्री लोकहितार्थ निर्णय घेत नाहीत व त्यांनी घेतलेले निर्णय अपयशी ठरत आहेत. तसेच सध्या कथित व्हेंटिलेटर घोटाळा समाजमाध्यमांवर थैमान घालत आहे. सदर विषय एकमेकांवर ढकलण्याचे काम सुरू आहे. सध्या राज्यातील जनतेकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. पण आपली खुर्ची कशी वाचवता येईल याकडे मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांचे जास्त लक्ष आहे हे स्पष्टपणे दिसून येत आहे. एक डॉक्टर असून सुद्धा मुख्यमंत्री रुग्णांची स्थिती समजू शकत नाहीत हे गोवेकरांचे दुर्भाग्य आहे, अशी टीका फर्नांडिस यांनी केली आहे. आज बळींची संख्या वाढल्यावर सरकार ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचा विचार करत आहे. आम आदमी पक्ष कित्येक दिवसांपासून कोविड महामारीची दुसरी लाट येण्याची शक्मयता असल्याने पूर्वनियोजन करून ठेवा अशी मागणी करत होता. पण सरकारने लक्ष दुसरीकडे केंद्रीत केल्यामुळे आज गोव्यातील जनतेची परिस्थिती अशी आहे, असे फर्नांडिस यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर कुडचडे शहराला सध्या कोणीच वाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हल्लीच आरोग्यमंत्र्यांनी कुडचडेच्या आमदारांबरोबर तयार होत असलेल्या इस्पितळात येऊन जाहीर केले होते की, हे इस्पितळ दक्षिण गोव्यातील मुख्य इस्पितळाच्या दर्जाचे करणार. सध्या कुडचडेतील लोकांवर जी स्थिती आली आहे ती पाहता आताच कुडचडेतील नवीन इस्पितळात आवश्यक सामग्री आणून लोकांना सावरावे. मडगावातील इस्पितळात, गोमेकॉत रुग्णांसाठी खाटा उपलब्ध नाहीत. त्याची दखल घेत कुडचडेतील नवीन इस्पितळ उपयोगात आणावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.