गुंता कायम, नगराध्यक्षांसह केवळ सहाच सदस्यांची उपस्थिती
प्रतिनिधी / कुडचडे
कुडचडे-काकोडा पालिका मंडळाच्या बुधवारी सकाळी बोलाविलेल्या खास बैठकीत नगराध्यक्ष मिळून पंधरा जण उपस्थित असायला पाहिजे होते. पण बैठकी फक्त सहा सदस्य उपस्थित होते. सदर सकाळच्या सत्रात घेतलेल्या बैठकीत विविध उपसमित्या निवडण्यात येणार होत्या तसेच मान्सूनपूर्व कामांवर व सोपो कंत्राटावर आणि इतर आवश्यक विषयांवर चर्चा होणार होती. पण सकाळच्या सत्रात गणपूर्ती झालेली नसल्यामुळे दुपारच्या सत्रापर्यंत बैठक पुढे ढकलण्यात आली. परंतु दुपारच्या सत्रातील बैठकीतही गणपूर्ती न झाल्यामुळे सदर बैठक शेवटी रद्द करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष बाळकृष्ण होडारकर यांनी दिली.
नगराध्यक्ष निवडीनंतर लगेच नवीन नगराध्यक्ष होडारकर यांच्याविरुध्द अविश्वास ठराव आणण्याचा व स्थानिक आमदार असलेले वीजमंत्री नीलेश काब्राल यांच्यासोबत जाऊन या ठरावाची नोटीस पालिका संचालकांना सादर करण्याचा प्रकार घडला होता. सदर नोटीस फेटाळण्यात आली असून त्यावर ज्या नगरसेवकांच्या सहय़ा होत्या त्यातील एक नगरसेवक या बैठकीस उपस्थित होता. सदर बैठकीस नगराध्यक्ष होडारकर यांच्यासोबत नगरसेवक प्रदीप नाईक, मंगलदास घाडी, क्लेमेंटिना फर्नांडिस, अपर्णा प्रभुदेसाई, सुशांत नाईक यांची उपस्थिती होती.
दरम्यान, बुधवारच्या बैठकीचे वृत्त पसरल्यानंतर कुडचडेत परत एकदा लोकांमध्ये नगरसेवकांबद्दल रोष निर्माण झालेला दिसून आला. नगराध्यक्ष निवडीवेळी झालेल्या प्रकारानंतर पालिकेत जो गुंता निर्माण झाला होता तो या बैठकीनंतर संपणार अशी अपेक्षा लोक करत होते. पण सदर गुंता सुटण्याचे नाव काढत नसल्यामुळे मतदारांनी नगरसेवकांना दिलेली बहुमोल मते आमदार व नगराध्यक्षांच्या भांडणात फुकट गेली असल्याची भाषा लोकांकडून ऐकू येऊ लागली आहे. तसेच कुडचडेतील मतदारांनी दोन वेळा मते देऊन निवडून आणलेले आमदार नगरसेवकांना दोष देताना अप्रत्यक्षपणे कुडचडेतील मतदारांवर टीका करत असल्यामुळे लोकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.