प्रतिनिधी / कुडचडे
कुडचडे-काकोडा पालिकेची निवडणूक होऊन एक महिना उलटला, तरी पालिकेचे नगराध्यक्षपद सध्या रिक्त असल्यामुळे पालिका परिसरातील लोकांकडून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. दरम्यान, पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आलेले प्रमोद नाईक यांनी पालिका मुख्याधिकारी अजय गावडे यांच्याकडे नगराराध्यक्षपदासाठी अर्ज सुपूर्द केला आहे. 29 रोजी कुडचडे नगराध्यक्षांची निवड होणार आहे.
राज्यात एक महिना अगोदर ज्या पालिकांच्या निवडणुका झाल्या तेथे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. पण कुडचडेत चाललेल्या राजकारणामुळे वेगळी स्थिती दिसून आली आहे. उपनगराध्यक्षांची निवड नुकतीच झालेली असून ज्या नगरसेविका याअगोदर सदर पदावर बिनविरोध निवडून आल्या होत्या त्यांनी नंतर राजीनामा दिला होता. त्याच परत एकदा सध्या उपनगराध्यक्षपदावर बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. बाळकृष्ण होडारकर यांना अविश्वास ठराव आणून नगराध्यक्षपदावरून हटविल्यानंतर आता त्या पदाचा भार कोण सांभाळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सध्या प्रमोद नाईक यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज सादर केला असून आणखी कोण अर्ज सादर करणार का याचे उत्तर गुलदस्त्यात आहे.