यंदा अनेक अनुभवी नगरसेवक निवडून आलेले असल्याने सर्वांना उत्सुकता
प्रतिनिधी / कुडचडे
कुडचडे-काकोडा पालिकेच्या नगराध्यक्षांच्या खुर्चीवर कोण बसणार याची लोकांत उत्सुकता वाढत चालली असून या विषयावर सर्वत्र चर्चा होताना दिसू लागली आहे. सध्या निवडून आलेल्या आणि यापूर्वी नगरसेवक राहिलेल्या दिग्गज उमेदवारांपैकी पाच जणांनी यापूर्वी नगराध्यक्षपदाचा भार सांभाळलेला आहे. यावेळी अनुभवी नगरसेवक जास्त असल्यामुळे नवीन मंडळ स्थापित झाल्यावर कोणाच्या हातात ही धुरा देणार याकडे लोकांचे लक्ष लागून आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नगराध्यक्षपदासाठी प्रदीप नाईक, विश्वास सावंत, जस्मिन ब्रागांझा, बाळकृष्ण होडारकर, सुशांत नाईक, अपर्णा प्रभुदेसाई व टोनी कुतिन्हो हे रांगेत असून यातील कोणाला इतर नगरसेवक पाठिंबा देतात की वेगळेच नाव पुढे येते याकडे सर्वांच्या नजरा आहेत.
दरम्यान, कुडचडे-काकोडा पालिका निवडणुकीचे निकाल अनेक हादरे देऊन गेलेले असून त्यात स्थानिक आमदार असलेले मंत्री नीलेश काब्राल यांना जवळचे असलेल्या उमेदवारांना मतदारांनी बाजूला सरकविल्यामुळे त्यांनाही हादरा बसल्याची लोकांत चर्चा आहे. पण निवडणूक निकाल घोषित झाल्यानंतर त्याचदिवशी संध्याकाळी जो प्रकार घडला व ज्या उमेदवारांवर पूर्ण भरवसा ठेऊन लोकांनी मते दिली होती त्यातील काही सत्ताधारी भाजपाचे जोडीदार होण्यासाठी ज्या प्रकारे पणजीला पोहोचले त्याबद्दल रोष व्यक्त होताना दिसू लागला आहे. याअगोदर राज्यातील काही आमदारांनी आपल्या मतदारांना विश्वासात न घेता दुसऱया पक्षात झेप घेतलेली आहे व या विषयावर सभापतींकडून तसेच न्यायालयाकडून निर्णय येणे बाकी आहे. कुडचडे पालिका निवडणूक निकालानंतर झालेला प्रकार ही त्याचीच पुनरावृत्ती असल्याची प्रतिक्रिया लोकांमधून उमटू लागली आहे.
कुडचडे पालिकेच्या निवडणुकीत मंत्री काब्राल यांनी प्रत्यक्ष कोणत्याच उमेदवाराला पाठिंबा दिलेला नसला, तरी निवडणुकीच्या अगोदरपासूनच काही उमेदवार हे आमदारांच्या गटाचे असल्याचा शिक्का लोकांनी त्यांच्यावर मारला होता. तसेच काही उमेदवार आपल्या मतदारांवर पूर्ण विश्वास ठेऊन उतरले होते आणि तसे त्यांनी उघड सांगितले होते. तरी सुद्धा असे काही उमेदवार जिंकल्यावर पणजीतील भाजप कार्यालयात पोहोचले. त्यामुळे सदर भागांतील मतदारांसमोर सध्या प्रश्नचिन्ह उभे झाले आहे.