खास बैठकीत निर्णय, नवीन शुल्काचा प्रस्ताव अमान्य, शुल्कवाढ जनतेला अडचणीची ठरण्याची भीती
प्रतिनिधी / कुडचडे
कुडचडेत अगोदरपासून कचरा उचलण्याच्या बाबतीत कायमस्वरूपी काळजी घेण्यात आलेली असून यापुढेही घेण्यात येईल. त्याचबरोबर पालिका संचालनालयाकडून नवीन कचरा शुल्क लागू करण्यासाठी जो प्रस्ताव पाठविण्यात आला आहे तो चांगला असला, तरी कुडचडे पालिका क्षेत्रात सदर नवीन दर लागू केल्यास जनतेला बऱयाच अडचणींना सामोरे जावे लागेल. याची दखल घेत पालिकेने याअगोदर घरोघरी कचरा गोळा करण्यासाठी जे शुल्क ठरविलेले आहे तेच कायम ठेवण्याचा निर्णय कुडचडे पालिका मंडळाच्या मंगळवारी झालेल्या खास बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती बैठकीनंतर नगराध्यक्ष बाळकृष्ण होडारकर यांनी दिली.
सर्व नगरसेवकांजवळ चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पालिका संचालनालयाने जो प्रस्ताव पाठविला आहे त्याला देण्यात येणाऱया उत्तरासोबत कुडचडे पालिका सध्या जे कचरा शुल्क आकारत आहे त्याची यादी पाठविण्यात येणार आहे. राज्यातील ज्या पालिकांना नवीन शुल्काचा प्रस्ताव मंजूर असेल त्या पालिका तो लागू करू शकतात. त्यास कुडचडे पालिकेचा कोणताच आक्षेप नाही, असे होडारकर यांनी स्पष्ट केले. सदर प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी पालिका सभागृहात ही खास बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीस स्थानिक आमदार असलेले वीजमंत्री नीलेश काब्राल, मुख्याधिकारी अजय गावडे, उपनगराध्यक्ष पिएदाद दिनीज, इतर नगरसेवक आणि पालिका अभियंता दीपक देसाई उपस्थित होते.
1 जूनपासून मार्केटमध्ये मासे-भाजीविक्री
कोविड-19 चा लॉकडाऊन सुरू असल्यामुळे तसेच कुडचडेतील जनतेला चांगले मासे व भाज्या मिळाव्यात याकरिता पालिकेने ठिकठिकाणी चालणाऱया मासे व भाजीविक्रीच्या जागांना आक्षेप घेतला नव्हता. पण सध्या लॉकडाऊन शिथील करण्यात आलेला आहे. त्यामुळे जे मासेविपेते पालिका क्षेत्रात विविध ठिकाणी बसून मासेविक्री करत होते त्यांनी 1 जूनपासून कुडचडे बाजारातील मुख्य मासळी मार्केटमध्ये बसावे. तसेच भाजीविपेत्यांनी जी-सुडा मार्केटमध्ये बसावे. अन्यथा जे स्वतंत्रपणे सदर व्यवसाय करण्यास इच्छुक आहेत त्यांनी पालिकेचा परवाना घ्यावा व आपला व्यवसाय सुरू करावा, असे निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचे होडारकर यांनी स्पष्ट केले.
सरकारी निर्णयाचा निषेध
याअगोदर सरकारने कोविड-19 च्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्याबाहेरून येणाऱया व्यक्तीकडून दोन हजार रुपये आकारण्याचे ठरविले होते. ते बंद करून कोणीही राज्यात येऊन ‘होम क्वॉरन्टाईन’ व्हावे हा निर्णय अत्यंत चुकीचा असून यात जनतेची कोणतीच सुरक्षा दिसत नाही. त्यामुळे या निर्णयाचा कुडचडे पालिका मंडळाने निषेध केलेला आहे, अशी माहिती होडारकर यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांशी बोलणी करणार : काब्राल
वीजमंत्री काब्राल यांनीही जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न पुढे येणार असल्यामुळे सरकारने वरील निर्णयावर फेरविचार करून जनतेच्या हितासाठी व्यवस्थित निर्णय घेण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांशी आपण बोलणी करणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच पालिका बैठकीत घेतलेल्या निर्णयांना आपले समर्थन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीतील चर्चेवेळी दिसून आल्याप्रमाणे, कुडचडे पालिका प्रत्येक घरामागे प्रति दिन 1 रुपया याप्रमाणे कचरा शुल्क आकारत असून सदर शुल्क घरपट्टी भरतेवेळी एकदाच वसूल करण्यात येते. त्याचप्रमाणे व्यापाऱयांकडून व्यापार परवाना नूतनीकरणावेळी ते भरण्यात येते. सर्व जण सदर शुल्क व्यवस्थित भरत असून त्यामुळे कुडचडे पालिकेने याअगोदर ठरविल्याप्रमाणे शुल्क आकारण्यात येणार असे पालिका संचालनालयाला कळविण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी गावडे यांनी दिली.