प्रतिनिधी / कुडचडे
कुडचडे भारतीय जनता युवा मोर्चा व गोवा मेडिकल कॉलेज, बांबोळी यांच्या संयुक्त विद्यमाने आज शुक्रवारी गोवा क्रांतिदिनाच्या दिवशी सकाळी 10.30 ते 1.30 पर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून कुडचडे मतदारसंघातील जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावे, असे आवाहन युवा मोर्चा अध्यक्ष सुरज परब यांनी पत्रकार परिषद घेऊन केले. यावेळी त्यांच्यासोबत कुडचडे भाजप मंडळाचे अध्यक्ष विश्वास सावंत, सचिव राजेंद्र वस्त, योगेश भोसले, यश वेर्लेकर, साहिल सावंत देसाई, समर्थ नाईक, वीरेंद्र शुक्ला, नागेश घाडी आदी उपस्थित होते.
सदर शिबिर स्थानिक आमदार तथा वीजमंत्री नीलेश काब्राल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केले आहे. कोरोना महामारीशी संबंधित प्रत्येक अटीचे पालन करून आयोजन केले जाणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने त्यांचे पालन करावे. त्याचबरोबर ज्या लोकांना कोविड संसर्ग झाला होता व आरोग्यात सुधारणा झाली आहे ते 35 दिवसांनी रक्तदान करू शकतात. तसेच ज्यांनी कोविडची लस घेतली आहे त्यातील कोणी इच्छुक असल्यास ते पंधरा दिवसांनंतर रक्तदान करू शकतात. गोवा मेडिकल कॉलेजमधून तीन डॉक्टर व त्यांचे सहकारी येणार आहेत. रक्तदानासाठी इच्छुक असलेल्यांनी 9370292741 वर संपर्क करून नोंदणी करावी, असे आवाहन परब यांनी केले आहे. जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावे, असे आवाहन सावंत यांनीही यावेळी केले.