पाटबंधारेमंत्री गोविंद कारजोळ यांची माहिती
बेळगाव : कुडची विधानसभा मतदारसंघातील दहा गावांतील 19 तलाव पुनर्भरण योजना जारी आहे. कृष्णा नदीतून तलावात पाणी सोडण्याची ही योजना आहे, अशी माहिती पाटबंधारेमंत्री गोविंद कारजोळ यांनी विधानसभेत दिली. कुडचीचे आमदार पी. राजीव यांच्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली आहे. प्रत्येक तलावाची क्षमता किती आहे, यासंबंधी संबंधित खात्याकडून माहिती घेऊन त्यानुसार योजना राबविण्यात येत आहे. 19 तलावांना नव्वद दिवसांत 24 तास पाणी सोडण्यासाठी पाईप घालण्यात येत आहेत. तलावांच्या क्षमतेनुसार किमान 63 एमएम व जास्तीत जास्त 200 एमएमच्या एचडीपीई पाईप्स घालण्यात येत असल्याचे गोविंद कारजोळ यांनी सांगितले. कुडची मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात तलावांचा पुनर्भरण कार्यक्रम सुरू आहे का? असा प्रश्न आमदार पी. राजीव यांनी उपस्थित केला होता. कृष्णा नदीतून दहा गावांतील 19 तलावांना पाणी सोडण्याची योजना जारी असल्याचे पाटबंधारेमंत्री गोविंद कारजोळ यांनी सांगितले.