मोरेनो रिबेलोचा आरोप
प्रतिनिधी /मडगाव
कुडतरी मतदारसंघातील पंचायत प्रभाग पुनर्रचनेत राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोप माजी जिल्हा पंचायत सदस्य मोरेनो रिबेलो यांनी काल पत्रकार परिषदेत केला. गोव्यात कार्निव्हल सुरू असतानाच घाई गडबडीत पंचायत प्रभाग पुनर्रचना करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
पंचायत प्रभाग पुनर्रचना करताना सर्व ग्रामस्थांना विश्वासात घेतले पाहिजे होते. मात्र, तसे न करता पुनर्रचना करण्यात आली. त्यात गोव्यात कार्निव्हल महोत्सव सुरू आहे. कार्निव्हल महोत्सव सुरू असतानाच पंचायत प्रभाग पुनर्रचना का करण्यात आली. त्यासाठी मुदतवाढ का देण्यात आली नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
कुडतरी मतदारसंघात पंचायत प्रभाग रचना करताना राजकीय हस्तक्षेप झाल्याचा दावा करण्यात आला. हा राजकीय हस्तक्षेप माजी आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी केला असावा अशी शक्यता ही त्यांनी यावेळी व्यक्त केली. आगामी पंचायत निवडणुकीत आपलेच उमेदवार निवडून येतील अशाच प्रकारे प्रभाग पुनर्रचना करण्यात आल्याचा दावा ही करण्यात आला.
राज्य निवडणूक आयोगाने ही पुनर्रचना त्वरित बंद करावी व लोकांच्या इच्छेनुसार प्रभाग पुनर्रचना व्हायला पाहिजे अशी मागणी मोरेनो रिबेलो यांनी केली आहे.