पाठलागही : वाळू माफियांचे कृत्य : आंदुर्ले खिंड येथे मध्यरात्रीनंतरची घटना
प्रतिनिधी / कुडाळ:
अवैध गौण खनिज वाहतूक रोखण्यासाठी कुडाळचे तहसीलदार अमोल पाठक व सहकारी कर्मचारी गस्तीवर असताना शुक्रवारी मध्यरात्रीनंतर दोन वाजण्याच्या सुमारास एका पांढऱया रंगाच्या होंडाई क्रेटा (एमएच-07-एजी-6966) कारने तहसीलदारांच्या वाहनाचा पाठलाग करण्यात आला. या प्रकरणी कुडाळ पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
आंदुर्ले खिंड येथे तपासणी करण्यासाठी तहसीलदार व सहकारी थांबले असता, कारमधून चित्तरंजन पी. सावंतसह चार व्यक्ती हातात दांडे व काचेच्या फुटलेल्या बाटल्या घेऊन उतरल्या आणि हल्ला करण्याच्या उद्देशाने ते तहसीलदार पाठक यांच्या अंगावर धावून आले. ‘रेती वाहतूक रोखण्यासाठी बाहेर पडाल, तर तंगडय़ा तोडू’, अशी धमकी देऊन त्या व्यक्तींनी शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याबाबत स्वत: पाठक यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
तहसीलदार कुडाळला माघारी फिरत असताना त्या कारने त्यांचा कुडाळ पोलीस ठाण्यापर्यंत पाठलाग केला. तहसीलदारांचे वाहन पोलीस ठाणे आवारात गेल्यानंतर ती कार निघून गेली.
कुडाळ व वेंगुर्ले तालुक्यातील खाडी, नदीतून मोठय़ा प्रमाणावर बेकायदा वाळू उत्खनन होते. कुडाळमधून मोठय़ा प्रमाणावर डंपर गोव्याच्या दिशेने जात असल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार पाठक यांच्यासह मंडळ अधिकारी गवस, तलाठी सोनवळे, तलाठी शिंदे व कोतवाल मोंडकर हे तालुक्यातील सरकारी वाहन (एमएच-07-जी-2131) ने गस्तीवर होते. तहसीलदारांचे वाहन आंदुर्ले-पाटच्या दिशेने जाताना होंडाई क्रेटा या पांढऱया रंगाच्या कारने तहसीलदार यांच्या वाहनाचा पाठलाग सुरू केला.
आंदुर्ले खिंड येथे हल्ला करण्याचा प्रयत्न
तहसीलदार व सहकारी पिंगुळी-पाट मार्गावरील आंदुर्ले येथे वाहन तपासणी करण्यासाठी थांबले, तेव्हा एकही वाहन आले नव्हते व थांबविले नव्हते. मात्र, पाठलाग करीत आलेली कार तेथे आली. त्या कारमधून चारजण हातात दांडे व काचेच्या फुटलेल्या बाटल्या घेऊन उतरले. तहसीलदारांच्या अंगावर हल्ला करण्याच्या उद्देशाने ते धावून गेले. चक्क वाहनासमोर एक बाटलीही फोडली. हल्ला करण्याच्या उद्देशाने आलेल्या त्या चौघांनी पाठक यांच्याजवळ येऊन धमकावले. रेती वाहतूक रोखण्यासाठी बाहेर पडाल, तर तंगडय़ा तोडू, अशी धमकी देऊन शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली, असे पाठक यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या चार व्यक्तींपैकी चित्तरंजन पी. सावंत हा त्या कारमध्ये होता. त्या कारचा क्रमांक ऍपवर तपासला असता, ती कार चित्तरंजन सावंत याच्या मालकीची असल्याचे समजते, असे तक्रारीत नमूद केले आहे.
सर्वजण होते दारुच्या नशेत!
हल्ला करण्याच्या उद्देशाने आलेल्या सर्व व्यक्ती दारुच्या नशेत होत्या. आपण कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी येत असताना पुन्हा आमच्या वाहनाचा पाठलाग करीत आले. आमचे वाहन पोलीस ठाणे आवारात आल्यानंतर ती कार निघून गेल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. पाठक यांनी पहाटे उशिरापर्यंत आपली तक्रार दाखल केली. सरकारी कामात अडथळा आणल्याचे तक्रारीत नमूद केले.
चारजणांविरुद्ध गुन्हा दाखल
कुडाळ पोलीस ठाण्यात पाठक यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी भादंवि कलम 353, 506, 504, 34 अन्वये गुन्हा दाखल केला. निवती पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडल्याने निवती पोलीस ठाण्याकडे तक्रार वर्ग करण्यात आली आहे. निवती पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
वरिष्ठांचे वेधले लक्ष
पाठक यांनी जिल्हाधिकारी यांच्यासह निवासी जिल्हाधिकाऱयांचे या घटनेकडे लक्ष वेधले.
दारुच्या नशेत वाळू माफियांचा हैदोस
वाळू व्यवसायात मोठय़ा प्रमाणावर पैसा मिळतो. अल्पावधीत खूप पैसा मिळत असल्याने काही वाळू व्यावसायिक रात्री हजारो रुपये दारुवर खर्च करतात. मद्यप्राशन करून नंतर रात्रभर अधिकारी-कर्मचाऱयांच्या पाळतीवर राहणे, पाठलाग करणे किंवा हल्ला करण्याच्या उद्देशाने पाठलाग करणे, अधिकाऱयांच्या बंगल्याबाहेर गाडय़ा लावून थांबणे, असे प्रकार करतात. यावर पोलीस यंत्रणेचा वचक नसल्यानेच त्यांनी शहरात जणू हैदोसच सुरू केला आहे. शुक्रवारी रात्री त्या चार तरुणांनी दारुच्या नशेत हा प्रकार केला आणि त्यामुळे प्रामाणिक व्यवसाय करणाऱयांनाही त्रास सहन करावा लागणार आहे.
राजकीय वरदहस्तामुळेच घडतात असे प्रकार
अधिकाऱयांनी अनधिकृत वाळू वाहतूक डंपर पकडले की, मोठमोठय़ा नेत्यांसह राजकीय लोकप्रतिनिधींचे दूरध्वनी येतात. त्यानंतर कारवाईशिवाय डंपर सोडण्याची वेळ महसूल यंत्रणेवर येते. आपण काहीही केले, तरी राजकीय नेते आमच्या पाठिशी आहेत, असे सांगत दादागिरी केली जात आहे. राजकीय नेत्यांच्या वरदहस्तामुळेच असे प्रकार घडण्याची मजल जाते. कुडाळ तहसीलदार कार्यालय, महाविद्यालय चौक, एमआयडीसी, झाराप, नेरुरपार जकात या भागात रात्रभर कार व मोटारसायकलस्वारांची फिरती असते. त्यांची पोलीस मात्र कधीच हजेरी घेत नाहीत, हे विशेष.