वार्ताहर / कुडाळ :
जावळी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, कुडाळ येथील शासकीय वसाहतीत लावण्यात आलेल्या मित्सुबिशी कारने आज दुपारी 12 च्या सुमारास अचानक पेट घेतला. या आगीत कारचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद कुडाळ पोलीस स्थानकात झाली आहे.
यासंदर्भात घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लावण्यात आलेल्या कारने अचानक पेट घेतला. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. पेट्रोल कार असल्याने रुग्णालय परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, प्रसंगावधान राखून प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी व स्थानिक युवकांनी तात्काळ पाण्याच्या बदल्या व टँकरच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, आगीत कारचे मोठे नुकसान झाले आहे.