प्रतिनिधी / वाकरे
ग्रामीण कार्यक्षेत्र असणाऱ्या आणि सर्वसामान्यांची “एक कुटुंब एक बँक” म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या कुडित्रे (ता. करवीर) येथील श्री यशवंत सहकारी बँकेची ऑल इंडिया अर्बन बँक कॅटेगरीमधून “बँको ब्ल्यू रिबन २०२०” पुरस्कारासाठी निवड झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील आणि उपाध्यक्ष हिंदुराव तोडकर यांनी पत्रकार बैठकीत दिली. म्हैसूर येथे सहकारी बँकांच्या मार्च २०२१ च्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या वार्षिक अधिवेशनात पुरस्कार वितरण होणार आहे.
श्री पाटील यांनी दिलेली माहिती अशी की बँकेचे सध्या १९,५०० सभासद असून एकूण १० शाखा कार्यरत आहेत, त्यापैकी कुडित्रे,रंकाळा,आसुर्ले पोर्ले,कळे, कसबा बीड येथे बँकेच्या स्वमालकीच्या इमारती आहेत. बँकेकडे सध्या १२० कोटी ६२ लाख रुपयांच्या ठेवी असून ७९ कोटी ६७ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे.बँकेचे भाग भांडवल ४ कोटी ९४ लाख इतके असून बँकेने २०० कोटी २९ लाख रुपयांचा व्यवसाय केला आहे. चार वर्षापूर्वी बँकेचे सध्याचे संचालक मंडळ अस्तित्वात येण्यापूर्वी १२० कोटी रुपयांचा व्यवसाय होता, यामध्ये गेल्या चार वर्षात ८० कोटींची भर पडली असून हा व्यवसाय २०० कोटी रुपयेवर पोहोचल्याचे ते म्हणाले.
गेली १० वर्षे बँकेचा एनपीए सतत शून्य टक्के आहे. बँकेने रिझर्व बँकेचे सक्षमतेचे सर्व निकष पूर्ण केले असून बँकिंग क्षेत्रात वाढती स्पर्धा असतानाही ग्राहकांचे हित लक्षात घेऊन बँकेने ग्राहकांना विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. बँकेचे स्वतःचे डाटा सेंटर असून ग्राहकांना एटीएम, एनईएफटी, आरटीजीएस, फास्टग, ई डिजिटल सेवा दिलेल्या आहेत. येत्या कांही दिवसात बँकेत मोबाइल बँकिंग सेवा कार्यान्वित होणार आहे.