‘कोरोना’मुळे प्रथमच यात्रा ग्रामस्तरावर : एकावेळी 50 भाविकांना दर्शनाचा लाभ : गावात येणाऱया सर्व मार्गांवर नाकाबंदी
वार्ताहर / देवगड:
दक्षिण कोकणची काशी समजल्या जाणाऱया श्री क्षेत्र कुणकेश्वरचा महाशिवरात्री यात्रोत्सव 11 मार्चपासून सुरू होत असून प्रथमच हा यात्रोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्तरावरच होणार आहे. श्री देव कुणकेश्वरची पहिली पूजा देवस्थान मानकरी यांच्या हस्ते होणार आहे. तसेच दर दोन तासांनी कुणकेश्वर परिसर सॅनिटाईज केला जाणार आहे. गावातील 50 भाविकांना एकावेळी दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. यात्रा कालावधीत परगावाहून येणाऱया भाविक यात्रेकरूंना बंदी करण्यात आली आहे. तसेच कुणकेश्वरकडे येणाऱया सहा मार्गांवर नाकाबंदी करण्यात आली आहे. कुणकेश्वरमध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
कुणकेश्वर महाशिवरात्रीला दरवर्षी लाखोंच्या संख्येने शिवभक्त श्री देव कुणकेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. गावोगावच्या देवस्वाऱयाही कुणकोबाच्या भेटीला येतात. आंगणेवाडीची यात्रा संपताच कुणकेश्वरमध्ये गजबज सुरू होते. महाशिवरात्रीपूर्वी आठ दिवस अगोदरच कुणकेश्वरमध्ये व्यापारी लवाजाम्यासह दाखल होत असतात. मात्र, यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळे महाशिवरात्री यात्रोत्सव शासन व प्रशासनाच्या निर्देशानुसार ग्रामस्तरावरच साजरा करण्यात येणार आहे. देवस्थान ट्रस्टने परगावाहून येणाऱया भाविकांना जेथे असाल तेथूनच श्री देव कुणकेश्वराला नमस्कार करण्याचे आवाहन केले आहे.
यात्रा कालावधीत कोरोनाच्या नियत्रंणासाठी केलेल्या नियमावलीची काटेकोरपणे अंमलबजावणी महसूल व पोलीस यंत्रणेकडून केली जात आहे. कुणकेश्वरकडे येणाऱया मार्गामध्ये बुधवारी रात्रीपासून नाकाबंदी करण्यात आली आहे. ग्रामस्तरावरच महाशिवरात्री यात्रोत्सव होत असून श्री देव कुणकेश्वराची पूजा यावेळी देवस्थान मानकऱयांच्याच हस्ते होणार आहे. गावातील 50 लोकांना एकाचवेळी दर्शनाची संधी मिळणार आहे. दर दोन तासांनी मंदिर परिसर सॅनिटाईज केला जाणार आहे. भाविकांना मास्क घालणे बंधनकारक असणार आहे. देवगडहून कुणकेश्वरकडे जाणाऱया मार्गावरील तारामुंबरी नाका, मिठबाव, कुणकेश्वर सुकेतळे, इळये वरंडवाडी फाटा, एमटीडीसी फाटा, दहिबाव फाटा येथे नाकाबंदी करण्यात आली आहे. कुणकेश्वरनजीकच्या मिठमुंबरी, इळये, कातवण या गावातील भाविकांना मंदिरात प्रवेश करताना ओळखपत्र म्हणून आधारकार्ड दाखवून प्रवेश देण्यात येणार आहे.
स्थानिक व्यापाऱयांना व्यवसायाची परवानगी
यंदा ग्रामस्तरावर होत असलेल्या या यात्रोत्सवासाठी श्री देव कुणकेश्वर मंदिर परिसरात विद्युत रोषणाई व मंडप व्यवस्था करण्यात आली आहे. यावर्षी दर्शन रांग करण्यात आलेली नाही. स्थानिक व्यापारी वर्गाला व्यवसायाची परवानगी देण्यात आली आहे. इतर व्यापारी वर्गाला कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही. कुणकेश्वरमध्ये यात्रा कालावधीत मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्यामुळे पोलीस छावणीचे स्वरुपच आल्याचे चित्र दिसत आहे.