जिल्हावासियांचा टाहो, बाधित-डिस्चार्ज वाढले, बेडसाठी धावाधाव
प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिल्हय़ाच्या बाधितांच्या आकडय़ाने 20 हजारांचा टप्पा गाठला आहे. कोरोनाचे संकट थांबायचे नाव घेत नाही. रोज बाधितांचे आकडे वाढते येत आहेत. त्याबरोबर डिस्चार्जही वाढला आहे. मात्र कोविड रूग्णालयांमध्ये बाधितांना बेड मिळत नसल्याची अतिशय गंभीर परिस्थिती कराड-साताऱयात पाहावयास मिळत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन बेड उपलब्धतेची माहिती एकाच खिडकीतून मिळण्याची व्यवस्था करण्याची गरज आहे. मंगळवारी 23 जणांचा मृत्यू झाला असून 422 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रात्री आलेल्या अहवालात … इतके कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
आकडय़ांचे नाविण्य संपले, बेडसाठी धावाधाव
कोरोनाच्या आकडय़ांनी गेल्या 15 दिवसांत विस्फोट केला आहे. आतापर्यंत बाधितांचा एका दिवसातील उच्चांकी आकडा 800 वर पोहोचला आहे. गेल्या पाच महिन्यातील रेकॉर्ड गेल्या पंधरा दिवसांतच मोडले गेले आहे. बाधितांचे आकडे वाढल्याने जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. कोविड रूग्णालयांमध्ये बेडच मिळत नसल्याची गंभीर परिस्थिती प्रामुख्याने कराड व साताऱयात जाणवत आहे. बेड मिळत नसल्याने अनेकजण स्वचाचणी करण्यासाठी पुढे येत नसल्याची वस्तुस्थिती दिसत आहे. बेड वाढवण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्ष लोकांना बेड मिळत नाहीत. कोविड रूग्णांची ही स्थिती असून नॉन कोविड परंतु गंभीर प्रकृती असणाऱया लोकांनाही लवकर बेड मिळत नाहीत. कोणत्याही रूग्णालयात चौकशी केली असता बेड शिल्लक नाही, असे उत्तर का मिळते? याचा शोध घेण्याची वेळ आता आली आहे. कराडमध्ये डायलेसिसच्या रूग्णांना वणवण फिरण्याची वेळ आली आहे. आरोग्यमंत्र्यांनी डॅशबोर्डची, पालकमंत्र्यांनी ऍपची सूचना मांडली होती. सध्यस्थितीत प्रशासनाने बाधितांना बेड मिळवून देण्याच्या प्रक्रियेत सूसुत्रीकरण करण्याची मागणी होत आहे.
लक्षणे नसणारांनी बेड अडवू नयेत-जिल्हाधिकारी
सातारा जिल्हय़ात प्रशासनासमोर बेड उपलब्धता हाच प्रमुख मुद्दा असल्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मंगळवारी दिलेल्या व्हीडीओ संदेशात मान्य केले. जिल्हय़ात रोज 2500 चाचण्या होत असून त्या आणखी वाढवण्यात येणार आहेत. जिल्हय़ाचा मृत्युदर 2.6 टक्के (593 मृत्यू) असून राज्याचा 3 टक्केवर आहे. मृत्यूदर कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी व्याधीग्रस्त लोकांचा सर्व्हे सुरू ठेवण्यात येणार आहे. हे रूग्ण लवकर डिटेक्ट झाल्याने त्यांना उपचार करून लवकर बरे करणे शक्य होत आहे. सातारा येथे जंबो हॉस्पिटल उभारणीसाठी आणखी 15 दिवसांचा कालावधी लागणार आहे. याशिवाय अन्य बेडही वाढवण्यात येणार आहेत. मात्र रूग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर घाबरून बेडची मागणी करत आहेत. यामुळे लक्षणे नसणारे रूग्ण बेड अडवून ठेवत असून अत्यवस्थ रूग्णांना बेड मिळत नसल्याची परिस्थिती आहे. लक्षणे नसणारांनी होम आयसोलेशनचा पर्याय घ्यावा. त्यामुळे क्रिटिकल रूग्णांना बेड मिळतील. यासाठी डॉक्टरांवर दबाव आणू नये. जिल्हय़ाचा रिकव्हरी रेट मृत्यू वगळता 97 टक्के आहे. लोकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
422 नागरिकांना डिस्चार्ज
मंगळवारी जिह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 422 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
जिल्हय़ात 23 बाधितांचा मृत्यू
मंगळवारी क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दहिवडी येथील 60 वर्षीय पुरुष, काले (ता. कराड) येथील 52 वर्षीय पुरुष, रिटकवली (ता. जावली) येथील 85 वर्षीय पुरुष, खेड (ता. सातारा) येथील 59 वर्षीय पुरुष, कोडोली सातारा येथील 55 वर्षीय पुरुष, चिंचणेर (ता. सातारा) येथील 39 वर्षीय महिला, भुयाचीवाडी (ता. सातारा) येथील 60 वर्षीय पुरुष, वाई येथील 35 वर्षीय पुरुष, वर्ये (ता. सातारा) येथील 60 वर्षीय महिला, तसेच जिह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये डिस्कळ येथील 56 वर्षीय महिला, विडणी येथील 65 वर्षीय पुरुष, रिंग रोड फलटण येथील 90 वर्षीय पुरुष, उडतारे येथील 78 वर्षीय महिला, मोरेवाडी (ता. पाटण) येथील 65 वर्षीय पुरुष, विहापुर कडेगाव येथील 62 वर्षीय पुरुष, औंध येथील 65 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, चिंधवली (ता. वाई) येथील 58 वर्षीय पुरुष, शेणोली (ता. कराड) येथील 68 वर्षीय पुरुष, कोळे (ता. कराड) येथील 65 पुरुष, गोळेश्वर (ता. कराड) येथील 78 वर्षीय पुरुष, कोळेवाडी (ता. कराड) येथील 78 वर्षीय महिला, मल्हार पेठ सातारा येथील 80 वर्षीय पुरुष या 23 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
1134 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 10, उपजिल्हा रुग्णालय कराड 44, उपजिल्हा रुग्णालय फलटण 92, कोरेगाव 82, वाई 155, खंडाळा 109, रायगांव 90, पानमळेवाडी 58, मायणी 84, महाबळेश्वर 50, पाटण 19, दहिवडी 46, खावली 49, तळमावले 20 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड 226 असे एकुण 1134 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत,अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
मंगळवारी जिल्हय़ात
एकुण बाधित
एकुण मुक्त 422
एकुण बळी 23
घेतलेले एकुण नमुने –51711
एकुण बाधित — 19609
घरी सोडण्यात आलेले — 11451
मृत्यू — 536
उपचारार्थ रुग्ण –7622