प्रतिनिधी / सरवडे
राधानगरी तालुक्यातील फराळे धनगरवाडा येथे आज पहाटे बिबट्याने कुत्र्याचा पाठलाग करीत थेट घराच्या पडवीत प्रवेश केला. कुत्र्याच्या आवाजाने पडवी शेजारी झोपलेली व्यक्ती जागी होवून पाहण्यासाठी गेली असता बिबट्याला चाहूल लागताच कुत्र्याला सोडून तो रामाठ्याच्या तटातून पळून गेला. परिसरात वावरणारा बिबट्या थेट घरात घुसल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. जंगली प्राण्यांचा धोका वाढल्याने उपाय योजना कराव्यात अशी मागणी भयभीत झालेले ग्रामस्थ करीत आहेत. यावेळी कुत्र्याचे मानेवर बिबट्याचे दाताचे जखमेचे व्रण दिसून आले. झोरे यांच्या प्रसंगावधानाने कुत्र्याचा जीव वाचला. घराशेजारी चिखलामध्ये बिबट्याच्या पायाचे ठसे मिळून आले. याबाबत गावामध्ये पाळीव जनावरे व गावातील ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
कालच सकाळी आसनगाव धनगर वाड्यावर बिबट्याच पायाचे ठसे प्रकाश झोरे यांना दिसून होते. आज पहाटे भांडणे, आसनगाव परिसरातील जंगल क्षेत्रात व पाणवठ्यावर कुठे बिबट्याचे ठसे मिळतात का याची पाहणी सुरू होती. त्याचवेळी सदरची घटना वनविभागाच्या समजल्याने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी राधानगरीचे वनपाल ए .जी. बिराडे, वनरक्षक कुमारी आफ्रीन देवळेकर वनकर्मचारी हिंदुराव पाटील व आनंदा पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.