वार्ताहर / कुदनूर
कुदनूर हे तसं नावाजलेलं गाव. मात्र, येथील स्मशानभूमीची दुर्दशा झाली होती. ही दुर्दशा पाहून गावातील काही तरुणांनी एकत्र येत स्मशानभूमी आणि परिसर स्वच्छ करण्याचा चंग बांधला. सध्या देशासह राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनचा सदुपयोग करत सोशल डिस्टन्सिंग पाळत या तरुणांनी स्मशानभूमीसह परिसर स्वच्छ केला.
येथील सवंगडी कट्टा या व्हॉट्सअॅप ग्रुपवर सामाजिक कार्यकर्ते राजू रेडेकर यांनी स्मशानभूमी सुशोभिकरण संदर्भात चर्चा केली. या चर्चेतून तेथील झालेल्या दुर्दशेवर बराच उहापोह झाला. त्यानंतर ग्रुपमधील अनिल निर्मळकर, दयानंद रेडेकर, नामदेव पवार, प्रभाकर तळवार, विठ्ठल निर्मळकर, महादेव बामणे, रसूल उस्ताद, हणमंत बामणे, लक्ष्मण शहापूरकर आदींनी स्वच्छता करण्यास पाठिंबा दर्शविला आणि प्रत्यक्ष कामास सुरुवात केली. गावापासून बर्याच अंतरावर असणारी ही स्मशानभूमी अर्थवट जळालेली लाकडे, मडकी, मृतासाठी वापरलेल्या तिरड्या, दारुच्या बाटल्यांसह वाढलेली झाडे-झुडपे आदींनी अस्वच्छ झाली होती. ग्रामपंचायत प्रशासनानेही याकडे दूर्लक्ष केले होते. मात्र, या तरुणांनी सदर परिसर स्वच्छ करत जेसीबीच्या साहाय्याने तेथील परिसराचे सपाटीकरणही केले.
सध्या कोरोनाचा जगभरात कहर सुरू आहे. ग्रामीण भागातही या कोरोनाची धास्ती तितकीच वाढत आहे.
यातून प्रशासनाकडून कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी बर्याच उपाययोजना राबविल्या जात आहेत. यासाठी लॉकडाऊनही वाढविण्यात आला असून, हा लॉकडाऊन कालावधी समाजाच्या कामी यावा या उद्देशाने येथील तरुण काम करत आहेत. लॉकडाऊनचा सदुपयोग करणार्या या तरुणांचे समाजमाध्यमातून कौतुक होत आहे. स्मशानभूमीच्या स्वच्छतेबरोबर तेथील परिसराला कंपाऊंड, गेट, गटर, पेव्हिंग ब्लॉक, लाईट व्यवस्था, पाण्याची टाकी, बगीचा करण्यासह परिसर सुशोभिकरण करणार असल्याचे या तरुणांकडून सांगण्यात आले आहे. यासाठी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मदतीचे आवाहनही करण्यात येत आहे.