वार्ताहर / कुद्रेमनी
बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉक्टर पथकाकडून कुद्रेमनी येथील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शुक्रवारी गावच्या हनुमान मंदिरामध्ये तपासणी व मार्गदर्शन करण्याचे कार्य करण्यात आले. पाच डॉक्टरांचे पथक गावात दाखल झाले होते. यावेळी नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.
यावेळी रक्तदाब, मधुमेह, वाढते वजन आदी आजारांची तपासणी करून औषध, गोळ्या देण्यात आल्या. अनेक नागरिकांनी यावेळी तपासणी करून घेतली. वेळच्या वेळी औषधोपचार न घेतल्यास लकवा मारण्याचा धोका निर्माण होतो, असे सांगून त्रास जाणवल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले.
बाची, चिरमुरी, सुळगा, बेनकनहळ्ळी गावांमध्येही डॉक्टरांचे पथक तपासणीकरिता कार्यरत असल्याचे सांगण्यात येते. आशा कार्यकर्त्या आरती लोहार, नंदा पाऊसकर, सुनिती बिजगर्णीकर, चंद्रभागा देवलतकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.