वार्ताहर / कुद्रेमनी :
येथील बलभीम साहित्य संघ आयोजित 14 वे मराठी साहित्य संमेलन रविवार दि. 12 रोजी कुद्रेमनी हायस्कूलच्या पटांगणात कै. परशराम मिनाजी गुरव साहित्यनगरीत चार सत्रात होणार आहे. संमेलनाचा जागर करण्यासाठी नागरिक सज्ज झाले आहेत. संमेलनाचे उद्घाटन बेळगाव जि. पं. च्या सदस्या सरस्वती पाटील यांच्या हस्ते होणार असून सकाळी 9 वाजता ग्रंथदिंडीचा सोहळा विठ्ठल-रखुमाईच्या मंदिरापासून निघणार आहे.
संमेलनाचे पहिले सत्र सकाळी 10 ते 12.30 यावेळेत आहे. बलभीम संघाचे अध्यक्ष एम. बी. गुरव यांच्या प्रास्ताविक भाषणानंतर स्वागताध्यक्ष नागेश राजगोळकर हे संघाच्यावतीने मान्यवरांचे स्वागत करणार आहेत. यानंतर मुंबईचे ज्येष्ठ साहित्यिक संमेलनाध्यक्ष प्रा. अशोक बागवे यांचे अध्यक्षीय भाषण होणार आहे.
दुपारी 12.30 ते 2 या वेळेत दुसऱया सत्रात कवी संमेलन होणार आहे. कवी विष्णू थोरे (नाशिक), कवी प्रशांत केंदळे (नाशिक), कवी उमेश सुतार (कोल्हापूर), कवयित्री मानसी दिवेकर (कोल्हापूर) हे या सत्रात सहभाग घेतील.
दुपारी 2 ते 2.30 यावेळेत स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे. बेळगाव वैभव इंडस्ट्रिजचे मालक सदानंद धामणेकर व जगदंब स्पोर्ट्स कुद्रेमनी यांनी स्नेहभोजनासाठी विशेष सहकार्य केले आहे.
दुपारी 3.30 ते 5 या वेळेत संमेलनाचे चौथे सत्र होणार आहे. बलवडीचे साहित्यिक शांतीनाथ मांगले यांच्या कथाकथन कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. संमेलनाचे सूत्रसंचालन रवी पाटील व पी. एल. गुरव करणार आहेत.
यावेळी चंदगड तालुक्याचे नूतन आमदार राजेश पाटील यांचा संघाच्यावतीने सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी पॉलीहैड्रॉन व्यासपीठाचे उद्घाटन मण्णूर येथील कंत्राटदार एस. एल. चौगुले, कै. रवळू गुरव, सभामंडपाचे उद्घाटन मराठा बँकेचे अध्यक्ष लक्ष्मण होनगेकर यांच्या हस्ते होणार आहे.
यानंतर विठ्ठल-रखुमाई मूर्ती पूजन भाग्यलक्ष्मी सोसायटीचे संचालक अर्जुन जांबोटकर, पालखी पूजन शांताराम पाटील, ग्रंथपूजन प्रकाश पाटील, ग्रंथदिंडीचे उद्घाटन डॉ. एल. एन. हुलजी, अश्वारुढ शिवपुतळा पूजन लक्ष्मण धामणेकर, प्रवेशद्वार उद्घाटन संभाजी पन्हाळकर, कै. परशराम गुरव साहित्यनगरीचे उद्घाटन शट्टूप्पा काकतकर करणार आहेत. ग्रंथदालनाचे उद्घाटन ज्ञानेश्वर पाटील, कै. परशराम गुरव स्मारक पूजन पुंडलिक दळवी (नेसरी), संत ज्ञानेश्वर प्रतिमा पूजन राजू मनोळकर (शिनोळी), संत तुकाराम प्रतिमा पूजन ऍड. सुधीर भ. चव्हाण (कंग्राळी), राजमाता जिजाऊ प्रतिमा पूजन विनायक गवसेकर (शिनोळी), महात्मा जोतिबा फुले प्रतिमा पूजन अर्जुन राजगोळकर, सावित्री फुले प्रतिमा पूजन डॉ. वंदना गुरव, राजर्षि शाहू महाराज प्रतिमा पूजन डॉ. भाग्यश्री व्ही. कट्टीमनी (कुद्रेमनी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा पूजन संजय पाटील (हेस्कॉम), स्वामी विवेकानंद प्रतिमा पूजन विष्णू जांबोटकर (बीएसएनएल) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
वैभव डेकोरेटर्स यांनी आकर्षक सभामंडपाची उभारणी केली आहे. प्राथमिक मराठी शाळेच्या पटांगणात ग्रंथदालनासाठी सोय आहे. गावातील युवक मंडळ, महिला मंडळे, भजनी मंडळे, विद्यार्थी, साहित्यिक, शिक्षक वर्ग आदींची उपस्थिती राहणार आहे.