कुपवाड / प्रतिनिधी
बाह्यऊर्जा पुरवठ्याशिवाय वातावरणात स्वयंचलित यंत्रणेद्वारे ऊर्जा संकलित करून इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस ऑपरेशनवर दक्षिण कोरिया येथे संशोधनात्मक अभ्यास करणारा कुपवाडचे सुपुत्र स्वप्नील नरदेकर याने नुकतीच अभिमानास्पद कामगिरी केली आहे. त्याच्या या यशाबद्दल कुपवाड परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अलिकडच्या काळात पोर्टेबल आणि वेअरेबल इलेक्ट्रॉनिक उपकरणे जलद विकासाच्या टप्प्यात आहेत. वैयक्तिक इलेक्ट्रॉनिक उपकरणे यामध्ये स्मार्ट घड्याळे, आरोग्य निरीक्षण प्रणाली, स्मार्ट चष्मा आदी लोकांच्या जीवनात बरीच सोय निर्माण करतात. या उपकरणांच्या निरंतर कार्यासाठी, अखंडित वीजपुरवठा मिळणे, हे एक आव्हान आहे. या समस्यांचे निराकरण करून मानवी जीवन अधिक सोयीचे व्हावे. त्यासाठी जेजू नॅशनल युनिव्हर्सिटी, दक्षिण कोरिया येथील संशोधकांची एक टीम स्वयं-संचालित तंत्रज्ञानावर काम करत आहे. या माध्यमातून पोर्टेबल आणि वेअरेबल इलेक्ट्रॉनिक्सला शाश्वत ऊर्जेचा पुरवठा सुलभ मिळू शकतो.
स्वयंचलित तंत्रज्ञान म्हणजे बाह्य ऊर्जा पुरवठ्याशिवाय कार्यरत वातावरणात ऊर्जा संकलित करून डिव्हाइस स्वतःचे ऑपरेशन राखू शकते. यासाठी कुपवाडमधील संशोधक विद्यार्थी स्वप्नील शितल नरदेकर (सध्या जेजू नॅशनल युनिव्हर्सिटी, दक्षिण कोरिया येथे पीएच.डी. करत आहेत) यांनी MoS2 क्वांटम शीट्सचा वापर करून अत्यंत कार्यक्षम स्वयंसक्षम प्रणालीची रचना करण्यासाठी पहिले पाऊल उचलले आहे. जे कोणत्याही बाह्य स्रोताशिवाय ऊर्जा निर्माण आणि साठवू शकते. अमेरिकन केमिकल सोसायटी (ACS नॅनो) या जगभरातील नामांकित जर्नलमध्ये त्यांनी नुकताच त्यांचा शोधनिबंध प्रकाशित केला आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल, जेजू राष्ट्रीय विद्यापीठ आणि तेथील प्राध्यापकांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.