कुपवाड / प्रतिनिधी
कुपवाडमधील माळीगल्ली येथे राहणाऱ्या अलका बाबूराव गौंडाजे यांच्या घरात घरफोडी करून चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत कुपवाड पोलिसांत नोंद झाली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अलका गौंडाजे यांच्या बंद घराचा दरवाजा उघडून चोरट्यांनी २४ हजार रुपये किंमतीचे सोने व चांदीचे दागिने लंपास केले आहेत. रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. याबाबत त्रिशला गौंडाजे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अलका गौंडाजे कुटुंबासह माळी गल्लीत राहतात. रविवारी घराला कुलूप लावून त्या परगावी गेल्या होत्या. याचा फायदा घेऊन रात्री चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि कपाटात ठेवलेल्या सोन्याच्या दोन अंगठ्या, बदाम, कानातील मुद्द्या, चांदीचा ग्लास, वाट्या, करंड, छल्ले, बिंदी, पैंजण, चांदीचे नाणे मिळून २३ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. अधिक तपास कुपवाड पोलिस करीत आहेत.