कुपवाड / प्रतिनिधी
किरकोळ कारणावरून कुपवाडमधील रॉयल सिटी येथे राहणाऱ्या रोहन ईश्वर माने या तरुणावर कोयत्याने हल्ला करून जखमी केल्याचा प्रकार घडला.
याबाबत कुपवाड पोलिसात नोंद झाली असून पोलिसांनी संशयित सुनिता राजेश बेन्नी व संजय जतकर दोघे रा.वसगडे ता.पलूस या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. तू आम्हाला सारखे पैसे का मागतोस, तुझा काय संबंध ?’ असे म्हणून कोयत्याने हल्ला केल्याचे समोर आले. याबाबत जखमी माने यांनी सुनिता बेन्नी व संजय जतकर यांच्या विरोधात फिर्याद दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री जखमी रोहन माने व त्याचा मित्र यशवंत हे दोघे जुना कानडवाडी रस्त्यावरून घरी जात होते. यावेळी रस्त्यावर उभारलेल्या संशयित सुनिता बेन्नी व संजय जतकर या दोघांनी माने याला अडवून ‘ तू आम्हाला सारखे पैसे का मागतोस, असे म्हणून शिवीगाळ व दमदाटी करून कोयत्याने हल्ला केला. यावेळी मध्यस्थी करणाऱ्या यशवंतलाही दोघांनी मारहाण केली. जखमींवर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले. पोलिसांनी बेन्नी व जतकर या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास कुपवाड पोलीस करीत आहेत.