दोनठिकाणी मोबाईल चोरले; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
कुपवाड / प्रतिनिधी
कुपवाड परिसरात चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ माजवला आहे. चोऱ्या-घरफोड्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना चोरट्यांनी आता रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना लक्ष्य करून रस्त्यात अडवून मोबाइल चोरण्याचे प्रमाण वाढवले आहे.
कुपवाडमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यावरून जाणाऱ्या दोघांना अडवून दोन मोबाईल चोरल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. याबाबत कुपवाड पोलिसात नोंद झाली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
यामध्ये रुपेशकुमार विनोद राऊत (रा.कुपवाड एमआयडीसी, मूळ गाव श्रीकृष्णनगर, बिहार)या परप्रांतीय तरुणाला रात्री दोघा अज्ञातांनी मिरज एमआयडीसी रस्त्यावर अडवून त्याच्या जवळील सात हजार रुपये किंमतीच्या मोबाईलची चोरी केली. तर दुसऱ्या घटनेत संदीप भागवत रास्ते (सध्या रा.मिरज एमआयडीसी मूळ गाव डोर्ली ता.जत)हा कामगार मिरज एमआयडीसीतून सावळीकडे जात असताना आरटीओ ऑफीस समोरील रस्त्यावरुन जाताना मागून दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञातांनी रास्तेच्या जवळील पाच हजार रुपये किंमतीच्या मोबाईलची चोरी केली. याबाबत दोघांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास कुपवाड पोलीस करीत आहेत.