कुपवाडातील इंटरनेट सेवा बंद
ऑनलाईन टीम / श्रीनगर :
कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये नियंत्रण रेषा ओलांडून घुसखोरी करण्याचा पाक लष्कराचा प्रयत्न सुरक्षा दलाने उधळून लावला. या कारवाईदरम्यान, सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक शहीद झाले. सुरक्षेच्या कारणास्तव कुपवाडातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
राकेश डोवल असे शहीद अधिकाऱ्याचे नाव आहे. ते बीएसएफमध्ये उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. दुपारी सव्वा एकच्या सुमारास पाक लष्कराच्या गोळीबारात ते जखमी झाले होते. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पाक लष्कराने आज बंदिपोरा जिल्ह्यात प्रथम शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. त्यानंतर केरन सेक्टरमध्ये आणि बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये पाक लष्कराने गोळीबार केला. भारतीय लष्कराने तिन्ही ठिकाणच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले.