ऑनलाईन टीम / श्रीनगर :
उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले. या कारवाईत लष्कराचा एक अधिकारी आणि 3 जवान शहीद झाले आहेत.
जम्मू-काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई सुरू आहे. शनिवारी रात्री उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये गस्त घालत असलेल्या गस्ती पथकाला संशयास्पद हालचाली आढळल्या. त्यानंतर सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली.
सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला. शनिवारी रात्री एका दहशतवाद्याला ठार मारण्यात सुरक्षा दलांना यश आले. त्यानंतर दहशतवाद्यांविरुद्ध मोहीम राबवण्यात आली. रविवारी दुपारपर्यंत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. लष्कराने तिन्ही दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. या कारवाईत एक अधिकारी आणि तीन जवान शहीद झाले. तर एक अधिकारीही जखमी झाल्याचे सांगण्यात येते.