एका दहशतवाद्याला कंठस्नान
श्रीनगर
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिह्यात नियंत्रण रेषेवर शुक्रवारी पहाटे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. तसेच एक जवान हुतात्मा झाला. घटनास्थळावरून एक रायफल, तीन एके मॅगझिन, 200 एके राऊंड, तीन पिस्तूल, चार पिस्तूल मॅगझिन आणि चार ग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे जम्मू काश्मीर पोलीस आणि लष्करी जवानांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. या कारवाईनंतर चकमक झालेल्या भागात दिवसभर शोधमोहीम राबविण्यात आली. तथापि, सायंकाळपर्यंत अन्य दहशतवाद्यांचा मागमूस लागू शकला नाही. संभाव्य घातपात टाळण्यासाठी या भागात अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.